धक्कादायक ! शास्त्रज्ञाच्या पत्नीवर पुजाऱ्याने केला बलात्कार
By ऑनलाइन लोकमत | Published: March 21, 2019 09:36 PM2019-03-21T21:36:16+5:302019-03-21T21:37:38+5:30
शास्त्रज्ञ पतीकडून ३ लाख ५० हजार रुपयांना गंडा घातला.
मुंबई - तंत्र - मंत्राने मुलाचा कॅन्सर बरा करतो अशी बतावणी करत एका शास्त्रज्ञाच्या उच्चशिक्षित पत्नीवर पुजाऱ्याने बलात्कार केला. इतक्यावरच तो भामटा पुजारी न थांबता त्याने त्याचे चित्रिकरण करून महिलेला ब्लॅकमेल करण्यास सुरुवात केली. तसेच शास्त्रज्ञ पतीकडून ३ लाख ५० हजार रुपयांना गंडा घातला.
या महिलेच्या मुलाचा मागच्या वर्षी मृत्यू झाला आहे. शेवटी तिने घडलेला सर्व प्रकार पतीला सांगितला. त्यानंतर दोघांनी पोलिसांत धाव घेतली. याप्रकरणी ट्रॉम्बे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडित दाम्पत्य चेंबूर परिसरात राहण्यास आहे. दोघेही उच्चशिक्षित आहेत. पती शास्त्रज्ञ आहे. त्यांना एकुलता एक मुलगा होता. त्याला कॅन्सर असल्याचे निदान २०१७ साली झाले होते. त्यानंतर त्याच्यावर इलाज सुरु करण्यात आला. मात्र औषधाचा फरक पडत नसल्याने त्याच्या आईने एका मंदिरातील पुजाऱ्याची भेट घेतली. विशिष्ट मंत्रसिद्धीने मुलगा बरा होऊ शकतो असे बतावणी त्याने महिलेशी केली. मुळच्या उज्जैनच्या असलेल्या पुजाऱ्याने महिलेच्या घरी जाऊन यज्ञ केला. यज्ञ सुरु केल्यावर महिलेचा मुलगा आणि महिलेला त्याने पवित्र राख प्राशन करण्यास सांगितले. त्यानंतर दोघेही बेशुद्ध झाले. काही वेळाने दोघेही शुद्धीवर आले. पुजारी घरातच होता. मुलाचा आजार बरा व्हावा म्हणून मी हे केले. तुमचा मुलगा लवकरच बरा होईल असे सांगितले. त्यानंतर तिच्याकडून ६० हजार रुपयांचे दागिने घेऊन तो निघून गेला.
काही दिवसांनी पुजाऱ्याने महिलेशी संपर्क केला. तिला अंधेरीतील घरी बोलवून घेतले. महिला घरी गेली तेव्हा तिच्यावर पुन्हा भामट्याने बलात्कार केला. हा कर्मकांडाचा एक भाग आहे असे त्याने तिला सांगितले. त्याने महिलेसोबतच्या कृत्याचे व्हीडीओ चित्रिकरण केले व फोटो काढले. त्याआधारे तिला ब्लॅकमेल करण्यास सुरुवात केली. मुलगा बरा करण्याच्या विधीसाठी त्याने महिलेच्या पतीकडून २ लाख ९८ हजार रुपयेही उकळले होते. मुलाच्या मृत्यूनंतरही त्याने पैसे उकळणे कायम सुरुच ठेवले. हा सर्व त्रास आणि अन्याय असह्य झाल्याने पीडित महिलेने हा प्रकार पतीला सांगितला. दोघांनी पोलिसांत तक्रार दिली. त्यानुसार बलात्कार, खंडणी, धमकावणे, जादुटोणाविरोधी कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे.