धक्कादायक! आर्थिक गुन्हे शाखेच्या दोन अधिकाऱ्यांच्या घरातच चोरी
By ऑनलाइन लोकमत | Published: July 30, 2019 04:46 PM2019-07-30T16:46:17+5:302019-07-30T16:50:14+5:30
या प्रकरणी माटुंगा पोलीस अधिक तपास करीत आहेत.
मुंबई - दादर रेल्वे पोलीस वसाहतीत राहणाऱ्या आर्थिक गुन्हे शाखेच्या दोन अधिकाऱ्यांच्या घरातचोरी झाल्याने खळबळ उडाली आहे. यात, साहाय्यक पोलीस निरीक्षक महिलेच्या घरातून ५० हजारांचा ऐवज चोरीला गेला आहे. या प्रकरणी माटुंगा पोलीस अधिक तपास करीत आहेत.
३२ वर्षीय तक्रारदार या दादर रेल्वे पोलीस वसाहतीतील पोलीस निरीक्षक इमारतीत राहतात. शुक्रवारी सकाळी साडेनऊच्या सुमारास पती नेहमीप्रमाणे घराबाहेर पडले. त्यापाठोपाठ त्यादेखील ११ च्या सुमारास कामावर गेल्या. सायंकाळी सहाच्या सुमारास घरी परतल्या तेव्हा, कुलूप बाजूला पडलेले होते. त्यांनी घरात प्रवेश करताच घरातील सामान अस्ताव्यस्त पडलेले दिसून आले. दागिन्यांसह ५० हजारांचा ऐवज चोरीला गेला होता. त्यांनी तत्काळ पोलिसांत तक्रार दिली. त्याचवेळी त्यांच्या शेजारील पोलीस उपनिरीक्षक इमारतीत राहणारे आर्थिक गुन्हे शाखेतील पोलीस निरीक्षक प्रवीण निळकंठ सावंत यांच्या घरातही चोरीचा प्रयत्न झाल्याचे समजले. सावंत यांचे सासरे कमलाकर शंकर दांडेकर (६६) यांनी त्यांना याबाबत कळविले. सावंत घरात नसताना, लुटारूने त्यांच्या दरवाजाची कडी तोडून घरात प्रवेश केला आणि ड्रेसिंग टेबल उघडलेला दिसला. मात्र घरातून काहीही चोरीला गेलेले नाही.
सकाळी ११ ते सायंकाळी ६ दरम्यान या घटना घडल्या आहेत. या प्रकरणी अधिक तपास करत असल्याची माहिती माटुंगा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक भरत भोईटे यांनी दिली.
यापूर्वीच्या घटना...
* ३ जुलै २०१९ - मरोळ पोलीस वसाहतीतील रहिवासी चंद्रकांत बागल (५८) सोन्याचे दागिने व ५१ हजारांची रोकड चोरीला गेली. ते मुंबई पोलीस दलात पोलीस हवालदार म्हणून कार्यरत आहेत.
*३० नोव्हेंबर २०१८ - नातेवाइकाच्या लग्नासाठी पुण्यात गेलले प्रदीप ज्ञानदेव खरात (३३) यांच्या घरातून ११ हजारांच्या रोकडीसह दागिने चोरीला गेले होते. ते माहिमच्या नवीन पोलीस वसाहतीत राहतात.
*१९ एप्रिल २०१८ - चुनाभट्टीतील पंचशीलनगर परिसरात मुंबई पोलीस दलात कार्यरत असलेले संदीप रामचंद्र झाडे यांच्या घरातून ४२,५०० रुपयांची चोरी झाली.
*२९ जुलै २०१७ : राज्य दहशतविरोधी विभागात (एटीएस) कार्यरत नीलेश मोहिते (४६) यांच्या बॉडीगार्ड पोलीस वसाहतीतील घरामध्ये घुसून एका लुटारूने तब्बल साडेतेरा तोळ्यांच्या सोन्याच्या दागिन्यांसह रोख रक्कम आणि सर्विस रिव्हॉल्व्हरसह ३० जिवंत काडतुसे चोरी केले. भायखळा पोलीस ठाण्यात याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.