Video : धक्कादायक! बंदी असतानाही मुंबईत होतेय कॉम्बॅट ड्रेसची विक्री
By पूनम अपराज | Published: March 5, 2019 09:44 PM2019-03-05T21:44:56+5:302019-03-05T21:50:11+5:30
मुंबई पोलिसांनी यावर कडक कारवाई करणं अत्यंत गरजेचं आहे.
मुंबई - १ जानेवारी २०१५ साली पठाणकोट येथील हवाई तळावर सहा दहशतवादी लष्करी गणवेशात घुसले होते आणि त्यांनी तेथे दहशतवादी हल्ला केला होता. त्यानंतर संपूर्ण देशभरात फॅशन म्हणून वापरले जाणारे आर्मी ड्रेस म्हणजेच कॉम्बॅट ड्रेस विक्री आणि खरेदीस बंदी घालण्यात आली होती. मात्र, मुंबईत रस्त्यावर कपडे विक्री करणाऱ्यांकडे सर्रास असे कपडे विकले जातात. मुंबईत सध्या पुलवामा पार्श्वभूमीवर हायअलर्ट जारी करण्यात आला आहे. त्यामुळे पठाणकोटप्रमाणे मुंबईत काही समाजविघातक व्यक्ती या ड्रेसचा दुरुपयोग करून घातपात घडवून आणू शकतात. त्यामुळे मुंबई पोलिसांनी यावर कडक कारवाई करणं अत्यंत गरजेचं आहे.
अगदी १०० ते ९०० रुपयांना हा लष्करी गणवेशासारखा दिसणारा शर्ट, टीशर्ट आणि पँट्स बाजारात उपलब्ध आहेत. या ड्रेसच्या विक्रीवर बंदी असताना देखील पोलीस कारवाई का करत नाहीत याबाबत मुंबई पोलिसांचे जनसंपर्क अधिकारी पोलीस उपायुक्त मंजुनाथ सिंगे यांना विचारले असता त्यांनी देखील अशा प्रकारच्या कपडे विक्रीस आणि खरेदीस बंदी असल्याचे सांगितले. तसेच आम्हाला जिथे या कपड्यांची विक्री आढळून येईल तिथेच विक्री थांबवू, आम्हाला अशा प्रकारच्या कपड्यांची कुठे विक्री सुरु असल्यास माहिती द्यावी अशी आवाहन सिंगे यांनी लोकमतशी बोलताना केले.
मुंबईची लाईफलाईन असलेली रेल्वे लोकल देखील दहशतवाद्यांच्या निशाण्यावर आहे. तसेच नुकतेच पश्चिम रेल्वेने देखील मध्य प्रदेश, गुजरात, मुंबई येथील रेल्वे स्थानकांत हायअलर्ट जारी केला आहे. त्यातच पठाणकोट येथे अतिरेक्यांनी आर्मी ड्रेसचा वापर करून घुसून केलेला भयानक हल्ला लक्षात ठेवून सुरक्षा यंत्रणांनी या गोष्टीकडे गांभीर्याने लक्ष देणं जरुरीचे आहे. भारतीय लष्करी गणवेशाचा मला अभिमान असून त्याची फॅशन म्हणून विक्री करण्यास मला कधीही आवडणार नाही म्हणून मी विक्री करत नसल्याचं फॅशन स्ट्रीट येथील विक्रेता संतोष दुबे यांनी लोकमतशी बोलताना सांगितले. तर दुसऱ्या एक व्यापाऱ्याने हे कपडे बांगलादेश आणि चीनवरून विक्रीसाठी येत असल्याची माहिती दिली.