धक्कादायक! पतीला जेवणातून स्लो पॉयझनची केमिकल देत राहिली; १७ दिवसांच्या उपचारानंतर मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: December 3, 2022 11:44 AM2022-12-03T11:44:00+5:302022-12-03T11:44:25+5:30
ब्लड रिपोर्ट पाहून डॉक्टरही चक्रावले. त्यांच्या ही बाब लक्षात आली नसती तर मुंबईतील महिला प्रियकरासोबत गेली असती...
मुंबईत डॉक्टरांच्या हुशारीमुळे एक धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. एका महिलेला पतीच्या हत्येप्रकरणी ताब्यात घेतले आहे. ही महिला प्रियकरासोबत जाण्यासाठी पतीला जेवणातून स्लो पॉयझन देत होती. पती १७ दिवस हॉस्पिटलमध्ये उपचार घेत होता, परंतू त्याचा मृत्यू झाला. प्रथमदृष्ट्या हा नैसर्गिक मृत्यू भासला असता परंतू डॉक्टरांच्या वेळीच एक गोष्ट लक्षात आली आणि पत्नीच्या कृत्याचा भांडाफोड झाला.
कमल कांत शाह यांच्या मृत्यूप्रकरणी त्यांची पत्नी कविता हिला अटक करण्यात आली आहे. कविता तिचा मित्र हितेश जैनच्या मदतीने पतीच्या जेवणात आर्सेनिक आणि थैलियम मिसळत होती. हे दोन्ही केमिकल स्लो पॉयझन म्हणून ओळखले जातात. या केमिकलच्या परिणामांमुळे कमलकांतला ३ सप्टेंबरला हॉस्पिटलमध्ये भरती व्हावे लागले होते. १७ दिवसांनी त्याचा मृत्यू झाला होता.
मुंबईच्या न्यायालयाने कविता आणि तिच्या मित्राला ८ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडीत पाठविले आहे. बॉम्बे हॉस्पिटलमधील डॉक्टरांनी कमलकांतच्या हत्येचा प्रयत्न झाल्याची तक्रार पोलिसांत दिली होती. य़ाच्या आधारावर पोलिसांनी ही कारवाई केली आहे.
उपचारावेळी डॉक्टरांनी कमल कांतच्या रक्ताची हेवी मेटल टेस्ट केली होती. तेव्हा त्याच्या रक्तात आर्सेनिक आणि थैलियमचा स्तर प्रचंड वाढलेला होती. माणसाच्या शरीरात हे धातू वाढणे अशक्य असते. यामुळे याची माहिती डॉक्टरांनी आझाद मैदान पोलिसांना दिली होती. पोलिसांनी तक्रार नोंदवून घेत पुढील तपास सांताक्रूझ पोलीसांकडे सोपविला.
चौकशीत समजले की कविता तिच्या प्रियकरासोबत मिळून पतीला रस्त्यातून हटविण्याचा मार्गावर होती. यामुळे तिने पतीच्या खाण्या पिण्यातून ही दोन केमिकल देण्यास सुरुवात केली होती. ही केमिकल शरीरात आधीपासूनच असतात. परंतू जर का त्यांचे प्रमाण वाढले तर ते स्लो पॉयझनचे काम करतात.