धक्कादायक! प्रियकराशी बांधायची होती लग्नगाठ, म्हणून नियोजित वरावर केला विषघात
By ऑनलाइन लोकमत | Published: May 4, 2021 09:59 PM2021-05-04T21:59:54+5:302021-05-04T22:00:35+5:30
Crime News : आठ वर्षांची प्रेमतपस्या खंडित होत असल्यानेच नियोजित वरावर विषप्रयोग करण्यात आला. प्रियकराच्या मदतीने थंडपेयातून विषारी द्रव पाजण्यात आला.
- किशोर वंजारी
यवतमाळ - आठ वर्षांची प्रेमतपस्या खंडित होत असल्यानेच नियोजित वरावर विषप्रयोग करण्यात आला. प्रियकराच्या मदतीने थंडपेयातून विषारी द्रव पाजण्यात आला. पेय सेवनासाठी शपथही घालण्यात आली, अशी कबुली दिल्याने पोलिसांनी तिला अटक केली. नेर येथे घडलेल्या विषप्रयोगाचे रहस्य अखेर उलगडले.
जांभुळणी (ता.बाभूळगाव) येथील किशोर परसराम राठोड या युवकाचा विवाह कोव्हळा (ता.नेर) येथील युवतीशी जुळला. १९ एप्रिल रोजी हे दोघे विवाह बंधनात अडकणार होते. त्यापूर्वीच तिच्या मनात होणाऱ्या पतीविषयी नकारात्मक भावना निर्माण झाली. त्याला कारण तिचे एका युवकाशी असलेले प्रेमसंबंध हाेते. आठ वर्षांपासून त्यांचा हा सिलसिला सुरू होता.
किशोरचे तिच्याशी लग्न होऊ नये, यासाठी या प्रेमवीरांनी प्लान आखला. १५ एप्रिल रोजी तिने किशोरला नेर येथे एका कोल्ड्रिंक हाउसमध्ये बोलाविले. यावेळी तिची लहान बहीण आणि दोन भाऊ सोबत होते. बोलता-बोलता तिने नियोजित वर किशोरकडे तीन हजार रुपयांची मागणी केली. किशोरने ही रक्कम दिलीही. त्याच वेळी तिने किशोरला थंडपेय पिण्याची गळ घातली. दोघांसाठीही पेय बोलाविण्यात आले. तिने मात्र पेय पिण्यास नकार दिला. तरीही काही घोट तिने घेतले. तिने घेतलेल्या थंड पेयामध्ये विषारी द्रव टाकले. प्रेमाची शपथ घालत तिने किशोरला द्रव टाकलेले पेय घेण्यास सांगितले. याच ठिकाणी किशोरचा घात झाला.
थंड पेय पिताच किशोरला मळमळ सुरू झाली. त्याच वेळी किशोरची होणारी पत्नी व तिचे भाऊ दुचाकीने निघून गेले. किशोर आपल्या मित्रासोबत कोव्हळा येथे जात असताना चक्कर येऊन खाली कोसळला. त्याला तातडीने नेर व नंतर यवतमाळ येथील खासगी रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले. यावेळी त्याला विषबाधा झाल्याचे पुढे आले. १३ दिवसांनी प्रकृती ठीक झाल्यानंतर किशोरने पोलिसात तक्रार दिली.
पळून जाण्याची होती योजना
युवतीला अटक केल्यावर या प्रकाराचे रहस्य बाहेर आले. तिने सारी कथाच सांगितली. लग्न तुटावे, म्हणून प्रियकराच्या मदतीने विषप्रयोगाचा प्रयत्न केला असल्याचे तिने जबाबात कबूल केले. लग्नाची तारीख पुढे जावी, पळून जाण्याची संधी मिळावी, म्हणून हा सर्व प्रकार घडवून आणल्याची ती म्हणाली. या कटामध्ये प्रियकरही सहभागी आहे. त्याच्यावरही कारवाई होणे अपेक्षित आहे. मात्र, त्याचा पोलीस विभागातील एक नातेवाईक त्याला वाचविण्याचा प्रयत्न करत असल्याची चर्चा आहे.
प्रियकराच्या मदतीने विषप्रयोगाचा प्रयत्न केला असल्याचे तिने जबाबात कबूल केले. लग्नाची तारीख पुढे जावी, पळून जाण्याची संधी मिळावी, म्हणून हा सर्व प्रकार घडवून आणल्याची ती म्हणाली. या कटामध्ये प्रियकरही सहभागी आहे. त्याच्यावरही कारवाई होणे अपेक्षित आहे. मात्र, त्याचा पोलीस विभागातील एक नातेवाईक त्याला वाचविण्याचा प्रयत्न करत असल्याची चर्चा आहे.