धक्कादायक! जादूटोण्याच्या संशयातून दोन मुलांसह जावयानेच केला घात
By संजय तिपाले | Published: December 13, 2023 05:57 PM2023-12-13T17:57:49+5:302023-12-13T17:58:55+5:30
गडचिरोलीतिहेरी हत्याकांडाचा उलगडा: ९ जणांना अटक, सहा महिन्यांपूर्वीच रचला होता कट
गडचिरोली: भामरागड तालुक्यातील अतिदुर्गम व नक्षलप्रभावित गुंडापुरी गाव तिहेरी हत्याकांडामुळेे हादरले होते. घटनेनंतर सातव्या दिवशी या प्रकरणाचा उलगडा करण्यात पोलिसांना यश आले. दोन मुलांसह जावई व गावातील इतर सहा जण अशा सर्वांनी मिळून वृध्द दाम्पत्यासह नातीचा खून केल्याची धक्कादायक बाब तपासात उघड झाली आहे.
पोलिस अधीक्षक नीलोत्पल यांनी १३ डिसेंबरला पत्रकार परिषदेत याबद्दल सविस्तर माहिती दिली. अपर अधीक्षक यतीश देशमुख, एम.रमेश, उपअधीक्षक बापूराव दडस यांची उपस्थिती होती. देवू दसरु कुमोटी (६०), बिच्चे देवू कुमोटी (५५,रा. गुंडापुरी ता. भामरागड) व अर्चना रमेश तलांडी (१०,रा.येरकल ता.एटापल्ली), अशी मयतांची नावे आहेत. देवू कुमोटी हे गावात पुजारी म्हणून काम करत, शिवाय ते जादूटोणा करत. आजारी रुग्णही त्यांच्याकडे जात. त्यांनी काही रुग्णांना बरे केल्याने ते परिसरात प्रसिध्द होते, परंतु गेल्या काही वर्षांत त्यांच्याकडे गेलेल्या काही रुग्णांचा मृत्यू झाला.
जादूटोणा करुन देवू कुमोटी हे बरे करण्याऐवजी बळी घेत असल्याचा संशय तयार झाला. यातून देवू कुमोटी यांच्याकडे उपचारासाठी येऊन आप्तस्वकियांना गमावलेल्यांमध्ये रोष तीव्र होत गेला. काही लोक देवू कुमोटी यांची मुले रमेश व विनू यांना टोमणे मारत, शिवाय दहा वर्षांपूर्वी देवू यांचा जावई तानाजी कंगाली (रा.विसामुंडी ता. भामरागड) याची दोन वर्षांची मुलगी आजारी पडल्यानंतर देवू यांच्याकडे उपचारासाठी नेली, पण तिचा दुर्दैवाने मृत्यू झाला. त्यामुळे जावयाच्या मनातही सासऱ्याबद्दल राग होता.
सहा महिन्यांपासून या तिघांसह गावातील लोकांनी देवू कुमोटी यांना संपविण्याचा कट रचला. ६ डिसेंबरला धान मळणीसाठी देवू कुमोटी, त्यांची पत्नी बिच्चे कुमोटी व नात (मुलीची मुलगी) अर्चना तलांडी हे तिघे गुंडापुरी शिवारातील झोपडीत झोपले होते. नऊ जणांनी मिळून लोखंडी हातोडा व धारदार सुरीने सुरुवातीला देवू नंतर बिच्चे व शेवटी अर्चनाचा गळा चिरुन निर्दयीपणे संपवले. विनू कुमोटी याच्या फिर्यादीवरुन बुर्गी (येमली) पोलिस ठाण्यात अज्ञातावर खुनाचा गुन्हा नोंद झाला होता. ऐन नक्षल सप्ताहात तिहेरी हत्याकांड घडल्यामुळे पोलिसांपुढे आव्हान होते.
संपूर्ण परिवाराला संपविण्याची मिळाली होती धमकी....
फिर्याद देताना विनू कुमोटी याने कोणावरही संशय नाही, असे स्पष्टपणे पोलिसांना सांगितले होते, त्यामुळे पोलिसांसाठी गुन्ह्याची उकल करणे कठीण बनले होते. मात्र, दोन दिवसांनी विनू कुमोटी याने घटनेच्या दोन दिवस आधी अज्ञात दोन व्यक्तींनी संपूर्ण परिवाराला संपविण्याची धमकी दिल्याची माहिती पोलिसांनी दिली. सुरुवातीला ही माहिती दडवल्याने पोलिसांचा संशय बळावला, पाच पथकांनी केलेल्या तपासानंतर संपूर्ण घटनाक्रमाचा उलगडा झाला.