धक्कादायक! शौचालयाची टाकी साफ करताना तीन तरुणांचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 18, 2020 14:56 IST2020-04-18T14:54:10+5:302020-04-18T14:56:04+5:30
एकावर अतिदक्षता विभागात उपाचार सुरू

धक्कादायक! शौचालयाची टाकी साफ करताना तीन तरुणांचा मृत्यू
वसई - लॉकडाऊन काळात विरार येथे एका बंगल्यातील शौचालयाची टाकी साफ करताना तिघा तरुणांचा दुर्देवी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी दुपारच्या सुमारास विरार येथे घडली.
विरार पश्चिमेच्या बोळींज विभागात रानपाडा गावात राहणाऱ्य हेमंत घरत यांनी आपल्या बंगल्यातील शौचालयाची टाकी साफ करण्याचे काम हाती घेतले होते. या कामाच्या निमित्ताने याच गावात राहणाऱ्या चार जणांनी लॉकडाऊन काळात आपणास पैसे मिळतील म्हणून हे काम स्वीकारले.
मात्र, शुक्रवारी दुपारी शौचालय टाकी सफाईचे काम करत असताना आतमध्ये विषारी वायुमुळे त्यांचा जीव गुदमरू लागला. दरम्यान, या प्रकरानंतर त्यांना लागलीच विरार येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र तिथे पोहचल्यानंतर नयन भोये, जयेंद्र मुकणे आणि तेजस भाटे या तिघांचा रुग्णालयात दाखल करण्याआधीच मृत्यू झाला असल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.तर नितेश मुकणे याच्यावर त्याच खाजगी रुग्णालयातील अतिदक्षता विभागात उपचार सुरु आहेत. या प्रकरणी अर्नाळा सागरी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.