धक्कादायक! कर्जबाजारीपणाला कंटाळून कुटुंबीयांची सामूहिक आत्महत्या
By ऑनलाइन लोकमत | Published: March 3, 2020 04:23 PM2020-03-03T16:23:49+5:302020-03-03T16:27:03+5:30
म्हापसा पोलिसांना सकाळी १० च्या सुमारास आत्महत्या घडल्याची माहिती मिळाली.
म्हापसा : खोर्ली-म्हापसा येथे एकाच कुटुंबातील चौघांनी आत्महत्या केल्याची हृदय पिळवटून लावणारी घटना मंगळवारी सकाळी उघडकीस आली. कर्जबारीमुळे सामुहिकआत्महत्या केल्याचा अंदाज म्हापसा पोलिसांनी लावला आहे. मूळ नेसरी-गडहिंग्लज (जि. कोल्हापूर) येथील कुटुंबीय काही वर्षांपासून गोव्यात वास्तव्यास होते.
ही घटना सकाळी १० च्या सुमारास उघडकीस आली. शाहू धुमाळे (४१), कविता धुमाळे (३४), पारस धुमाळे (९) व साईराज धुमाळे (अडीच वर्षे) असे मयतांची नावे आहेत. पोलिसांना घटनास्थळावरून सुसाइड नोट सापडल्याची माहिती म्हापसा पोलीस स्थानकाचा अतिरिक्त ताबा असणारे उपअधीक्षक एडविन कुलासो यांनी पत्रकरांना दिली.
एडविन कुलासो म्हणाले की, म्हापसा पोलिसांना सकाळी १० च्या सुमारास आत्महत्या घडल्याची माहिती मिळाली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. यावेळी शाहू धुमाळे यांचा मृतदेह हा फ्लॅटमधील हॉलमध्ये पंख्याला लटकलेला सापडला. तर पत्नी कविता व दोन्ही मुलांचा मृतदेह बेडरूममध्ये कॉटवर आढळले. याप्रकरणी म्हापसा पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह शवचिकित्सेसाठी बांबोळी येथील गोमेकॉत पाठवून दिला आहे. या प्रकरणी पुढील तपास सुरू आहे.