धक्कादायक! पत्नीने मुलासोबत केली पतीची हत्या
By ऑनलाइन लोकमत | Published: December 5, 2019 11:47 PM2019-12-05T23:47:58+5:302019-12-05T23:48:22+5:30
पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद करत मृतदेह ताब्यात घेऊन तो शवविच्छेदनासाठी पाठवला.
नालासोपारा - दारूच्या अतिव्यसनामुळे वडिलांचा मृत्यू झाल्याची तक्रार मुलाने रविवारी वालीव पोलीस ठाण्यात दिली होती. पण पोलिसांना या प्रकरणात आलेला संशय तसेच वैद्यकीय अधिकाऱ्याने दिलेल्या शवविच्छेदन अहवालाच्या आधारे पोलिसांनी या प्रकरणाचा उलगडा केला. पोलिसी खाक्या दाखवताच या नाट्यमय हत्येचा उलगडा झाल्यानंतर पोलिसांना धक्काच बसला. दारू पिऊन नवरा त्रास देत असल्याने पत्नी आणि मुलानेच त्याला ठार मारल्याचे या तपासातून समोर आले. या प्रकरणी पोलिसांनी पुरावा नष्ट करणे तसेच हत्येचा गुन्हा दाखल करून आरोपी पत्नी आणि अल्पवयीन मुलाला अटक केली आहे.
वसई पूर्वेकडील वालीव गावातील मराठी शाळेच्या पाठीमागे असलेल्या रमेश माळवी बिल्डिंगमध्ये राहणाऱ्या अंकुश चव्हाण (४५) यांचा शनिवारी रात्री साडेदहा ते साडेअकरा दरम्यान दारूचे अतिसेवन केल्याने मृत्यू झाल्याची तक्रार त्यांचाच मुलगा कृष्णा (१९) याने रविवारी दिली. पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद करत मृतदेह ताब्यात घेऊन तो शवविच्छेदनासाठी पाठवला. मात्र, मृतदेह पाहिल्यावर पोलिसांना संशय आला होता. तसेच शवविच्छेदन अहवाल मिळाल्यानंतर पोलिसांनी कसून चौकशी करताच पत्नीने आपणच मुलासोबत मिळून नवऱ्याची हत्या केल्याचे कबूल केले.
अंकुश नेहमी दारू पिऊन पत्नी शोभा चव्हाण आणि मुलांना मारहाण करायचा. दारूसाठी घरातील दागिने तसेच पैसे घेऊन जायचा. पत्नी आणि मुलगी पूजा या दोघांच्या चारित्र्याच्या संशय घेऊन त्यांना नेहमी घाणेरड्या शिव्या द्यायचा. घटनेच्या दिवशी रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास दारू पिऊन आलेल्या अंकुशनेपत्नी आणि मुलीला चारित्र्याच्या संशयावरून अश्लील शिवीगाळ करत घरातील लाकडी खाटेवर झोपून गेला. या रोजच्या त्रासाला कंटाळलेल्या पत्नी शोभा हिने मुलाला मदतीला घेत ओढणीने अंकुशचा गळा आवळून त्याला जीवे ठार मारले. तसेच पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने त्याचा मृतदेह घराबाहेर व्हरांड्यात ठेवून दारूच्या अतिसेवनामुळे त्याचा मृत्यू झाल्याची खोटी तक्रार देण्यास मुलाला सांगितले.
अकस्मात मृत्यू झाल्याची खोटी तक्रार देण्यात आली होती, पण मृतदेह शवविच्छेदनसाठी पाठविल्यावर वैद्यकीय अधिकाऱ्याने अहवाल दिल्यानंतर हत्येचा गुन्हा दाखल करून पत्नी व मुलाला अटक केली आहे. पत्नीला वसई न्यायालयात हजर केले असता सात दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली असून, अल्पवयीन मुलाची भिवंडी येथील बालसुधारगृहात रवानगी केली आहे.
- अनंत पराड, तपास अधिकारी आणि पोलीस निरीक्षक, वालीव पोलीस ठाणे