धक्कादायक...! केवळ 50 रुपयांत स्फोटकांनी भरलेली बॅग जम्मूला पोहोचवली; शहर उडाले असते
By ऑनलाइन लोकमत | Published: October 2, 2019 03:14 PM2019-10-02T15:14:41+5:302019-10-02T15:15:13+5:30
दांम्पत्याने बॅग चालकाकड़े ठेवण्यासाठी दिली आणि त्यांनी डोगरी भाषेतून चालकाशी चर्चा केली.
कठुआ जिल्ह्यातील बिलावर येथून स्फोटके जम्मूमध्ये केवळ 50 रुपयांमध्ये पोहोचवण्यात आली. खासगी बसचालकाला स्फोटकांनी भरलेली बॅग ठेवण्यासाठी एका दाम्पत्याने 50 रुपये दिले होते. ही स्फोटके एवढी होती की त्याद्वारे एखादे छोटे शहर उडविता आले असते. जवानांच्या सतर्कतेमुळे दहशतवाद्यांचा मोठा कट उधळला गेला आहे.
दांम्पत्याने बॅग चालकाकड़े ठेवण्यासाठी दिली आणि त्यांनी डोगरी भाषेतून चालकाशी चर्चा केली. महिलेने कांबळे ओढलेले होते, तर पुरुषाने कुर्ता पायजमा घातला होता. यानंतर चालकाने ही बॅग कंडक्टरकडे देण्यास सांगितली. त्यांनी ही बॅग बाड़ी ब्राह्मणामध्ये मुले येऊन घेऊन जातील असे सांगितले. कंडक्टरने ही बॅग मागील डीक्कीमध्ये ठेवली. मात्र, त्या स्टॉपवर कोणीच ती बॅग नेण्यासाठी आले नाही. तिथे दहा मिनिटे बस थांबलेली होती. एकएक करून सर्व प्रवासी उतरले होते. बसने जम्मू गाठले तरीही कोणी नेण्यासाठी आले नाही.
जेव्हा बस शहराच्या केसी वळणावर पोहोचली तेव्हा बसमध्ये एकच प्रवासी होता. महत्वाचे म्हणजे या बसमध्ये आधीच काही जवान बसलेले होते. टीए बटालियनचे जवान सांबा येथून प्रवास करत होते. त्यांनी दांम्पत्याला बॅग देताना पाहिले होते. संशय आल्याने त्यांनी ही बॅग कोण न्यायला येतो का यावर नजर ठेवली होती. मात्र, कोणीही न आल्याने त्यांनी शेवटी पोलिसांना फोन करून याबाबतची माहिती दिली.
यानंतर बॅग पाहिली असता त्यामध्ये स्फोटके सापडली. एखादे शहर उडविण्याची क्षमता असलेली स्फोटके सापडल्याने सुरक्षा यंत्रणाही हादरल्या. केवळ 50 रुपयांत पंजाबच्या सीमेजवळून ही बॅग जम्मूमध्ये नेण्यात आली होती. पोलिस आणि जवानांच्या टीमने बॅग ताब्यात घेत बस चालकासह अन्य एका प्रवाशाला चौकशीसाठी नेले. तर दांम्पत्याचे स्केच तयार करण्यात आले आहे.