बालकाला पळविणाऱ्या परप्रांतियास पोलीसांनी सोडले?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 2, 2020 06:01 PM2020-03-02T18:01:18+5:302020-03-02T18:01:32+5:30
वैभववाडी पोलीस ठाण्यातील धक्कादायक प्रकार; ग्रामस्थांनीच पुन्हा दिले पकडून
वैभववाडी(सिंधुदुर्ग): तालुक्यातील कोळपे येथील दीड वर्षाच्या बालकाला पळूवन नेणाऱ्या परप्रांतीय व्यक्तीला स्थानिकांनी रविवारी(ता.१) पकडून पोलीसांच्या ताब्यात दिले. परंतु, पोलीस स्थानकातून तो परप्रांतीय पसार झाला. त्यानंतर पुन्हा त्याचा शोध घेऊन कोळपे ग्रामस्थांनीच त्याला पकडून दिले. मात्र, बालक चोरीचा गंभीर गुन्हा नोंदविण्याऐवजी संशयिताच्या बाबतीत पोलिसांनी बेफिकीरी दाखविल्यामुळे कोळपे ग्रामस्थ आक्रमक झाले असुन त्यांनी पोलीस स्थानकात येवुन पोलीसांशी हुज्जत घातली. त्यानंतर गुन्हा दाखल करण्याची प्रकिया हाती घेतली आहे.
कोळपे येथील एका घरातील दीड वर्षाच्या बालकाला घेवुन एक अनोळखी पळून जात होता. हा प्रकार बालकाच्या आईच्या नजरेस पडताच तिने आरडाओरडा केला. त्यामुळे तात्काळ जमलेल्या शेजा-यांनी पाठलाग करुन त्या व्यक्तीला पकडले. त्याच्याकडून बालकाला काढून घेऊन आईच्या स्वाधीन केले. त्यानंतर त्या अनोळखी परप्रांतीयाला घेऊन बालकाचे नातेवाईक व ग्रामस्थांनी वैभववाडी पोलीस स्थानक गाठले. त्याला पोलीसांच्या स्वाधीन करुन त्याच्यावरुद्ध बालक चोरीचा गुन्हा नोंदविण्याची मागणी केली.
त्यावेळी ठाणे अंमलदाराने नातेवाईकांचा मोबाईल नंबर घेत उद्या सकाळी तुम्हाला बोलावून तक्रार घेतो, असे सांगीतले. त्यामुळे नातेवाईक रात्री उशिरा घरी गेले. मात्र, सकाळी पोलीस ठाण्यातून फोन न गेल्यामुळे नातेवाईक आणि काही ग्रामस्थ पोलीस स्थानकात दाखल झाले. परंतु, रात्री पकडून दिलेली व्यक्ती त्यांना पोलीस स्थानकात दिसून आली नाही. चौकशी केल्यानंतर ती व्यक्ती पसार झाल्याचे उघड झाल्याने संतापलेल्या कोळपे ग्रामस्थांनीच पुन्हा त्याचा शोध सुरु केला. बालकाला पळवून नेण्यासारख्या गुन्ह्यातील संशयित आरोपी पोलीस स्थानकातुन पसार होतोच कसा? असा प्रश्न करीत ग्रामस्थांनी पोलीसांशी हुज्जत घातली. त्यावेळी ग्रामस्थ आणि पोलीसांमध्ये शाब्दीक खटके उडाले. त्यानंतर पोलीस आणि ग्रामस्थ त्या व्यक्तीच्या शोधावर गेले.
वैभववाडी-तळेरे मार्गावरील कोकिसरे रेल्वे फाटकानजीक बालक पळवून नेताना पकडलेला संशयित रेल्वेस्थानकाच्या दिशेने जात असल्याचे ग्रामस्थांना दिसला. त्यामुळे कोळपे ग्रामस्थांनी ही माहीती तत्काळ पोलीसांना दिल्यानंतर पोलीसांनी त्याला ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात नेले.
ठाणे अंमलदारावर कारवाई करावी
दीड वर्षाच्या बालकाला घरातून पळवूनघेऊन जाणे. या गंभीर घटनेबाबत रविवारी(ता.१) रात्री गुन्हा दाखल करु न शकलेल्या ठाणे अंमलदाराविरोधात ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त करीत त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी केली आहे. तसेच पोलीस ठाण्यातून संशयित पळून गेला कसा? याचीही चौकशी व्हावी, अशी मागणीही संतप्त ग्रामस्थांकडून केली जात आहे.