Sidhu Moose wala Murder: मुसेवाला यांच्यावर गोळ्या झाडणारे शूटर्स अटकेत, एके-४७ रायफलचा केला वापर
By ऑनलाइन लोकमत | Published: June 21, 2022 06:48 AM2022-06-21T06:48:36+5:302022-06-21T06:49:04+5:30
Sidhu Moose wala Murder: पंजाबी गायक सिद्धू मुसेवाला हत्येप्रकरणी दोन शार्प शूटरसह तिघांना अटक करण्यात आली आहे. प्रियव्रत फौजी आणि कशिश अशी त्यांची नावे आहेत. हे दोघे एका साथीदारासोबत गुजरातच्या मुंद्रा बंदरानजीक भाड्याच्या घरात दडी मारून होते.
- बलवंत तक्षक
चंडीगड : पंजाबी गायक सिद्धू मुसेवाला हत्येप्रकरणी दोन शार्प शूटरसह तिघांना अटक करण्यात आली आहे. प्रियव्रत फौजी आणि कशिश अशी त्यांची नावे आहेत. हे दोघे एका साथीदारासोबत गुजरातच्या मुंद्रा बंदरानजीक भाड्याच्या घरात दडी मारून होते.
प्रियव्रत फौजी हा हरयाणातील सोनीपत जिल्ह्यातील गढी सिसानाचा आणि कशिश ऊर्फ कुलदीप झज्जर जिल्ह्यातील बेरी गावाचा आहे. भटिंडाच्या केशवलाही जेरबंद करण्यात आले आहे. फौजी याच्यावर २५ हजार रुपयांचा इनाम आहे.
पोलिसांनुसार मुसेवाला हत्याकांडात सहा शार्पशूटर्स सामील होते. त्यांनी मुसेवालावर बॉम्ब हल्ला करण्याचाही बेत आखला होता. मुसेवालाची हत्या केल्यानंतर शार्प शूटर्संनी कॅनडातील गोल्डी बराडला फोन करून काम झाल्याचे कळविले होते. दोन पथके मुसेवालाची हत्या करण्यासाठी बराडच्या संपर्कात होते, असे पोलीस चौकशीत समोर आले आहे. यापैकी बोलेरो कार कशिश चालवित होता, तर कारमध्ये फौजीसोबत अंकित सेरसा आणि दीपक मंडी होता. दुसरे वाहन (कोलोरा) जगरुप चालवित होता. या वाहनात मनप्रीत मन्नू त्याच्यासोबत होता. सर्वात आधी शार्पशूटर मन्नूने एके-४७ रायफलीतून मुसेवालावर गोळी झाडली. त्यानंतर दोन्ही वाहनांतील सर्व सहा शूटर्संनी खाली उतरून मुसेवालावर गोळ्या झाडल्यानंतर घटनास्थळावरून पसार झाले.
मुसेवालाच्या हत्येनंतर मन्नू आणि जगरुप वेगळ्या दिशेने गेले; केशव त्यांना गाडीतनू हरयाणातील फतेहाबादला घेऊन आला. नंतर ते लपत-छपत गुजरातला गेले. सोमवारी त्यांना पकडण्यात पोलिसांना यश आले.