जळगावात उपमहापौरांच्या घरावर गोळीबार; भांडण सोडविण्यावरून झाला वाद
By ऑनलाइन लोकमत | Published: July 25, 2021 11:17 PM2021-07-25T23:17:22+5:302021-07-25T23:17:51+5:30
Crime News : पिंप्राळा भागात रविवारी दुपारी खेळण्यावरून दोन गटात हाणामारी झाली. या दोघांचा वाद सोडविण्यासाठी उपमहापौर कुलभूषण पाटील हे पोलीस स्टेशनला गेले होते. याठिकाणी त्यांना एका गटाने शिविगाळ केली.
जळगाव : जळगावचे उपमहापौर कुलभूषण पाटील यांच्यावर रविवारी रात्री ९ वाजेच्या सुमारास मंगलसिंह राजपूत, उमेश व महेंद्र राजपूत यांनी कारमधून येत गोळीबार केल्याची घटना झाली. या घटनेनंतर पाटील यांच्या निवासस्थानासमोर कार्यकर्त्यांची मोठ्या प्रमाणात गर्दी झाली. घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांचा ताफा घटनास्थळी पोहोचला.
पिंप्राळा भागात रविवारी दुपारी खेळण्यावरून दोन गटात हाणामारी झाली. या दोघांचा वाद सोडविण्यासाठी उपमहापौर कुलभूषण पाटील हे पोलीस स्टेशनला गेले होते. याठिकाणी त्यांना एका गटाने शिविगाळ केली. त्यानंतर पाटील हे दुपारी आपल्या कार्यालयात आले असता त्यांना फोनवरून शिविगाळ करण्यात आला.
दरम्यान, संध्याकाळी पाटील हे घराकडे जात असताना त्यांच्यावर एक गोळी फायर करण्यात आली. त्यानंतर ते घराकडे पळाल्यानंतर मंगलसिंह राजपूत, उमेश राजपूत, महेंद्र राजपूत यांच्यासह बिर्हाडे नामक तरुणाने तीन गोळ्या झाडल्या. घटनेनंतर नागरिक या ठिकाणी मोठ्या संख्येने जमा झाल्यानंतर हल्लेखोरांनी पळ काढल्याची माहिती स्वत: कुलभूषण पाटील यांनी प्रसिद्धी माध्यमांशी बोलतांना दिली.