मुख्याध्यापकावर गोळीबार : सहायक शिक्षकाने रचला कट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2020 07:01 PM2020-07-25T19:01:12+5:302020-07-25T19:30:28+5:30
या प्रकरणात सहायक शिक्षकासह आणखी एका आरोपीला अटक केल्याने या प्रकरणातील आरोपींची एकूण संख्या तीन झाली आहे.
मालेगाव : अमानी येथील जिल्हा परिषद शाळेच्या मुख्याध्यापकावर गोळीबार करण्याचा कट रचून शस्त्र खरेदीसाठी सहायक शिक्षक गजानन महादेव इंगळे याने शस्त्र खरेदीसाठीही ४० हजार रुपये दिल्याची कबुली या घटनेतील मुख्य आरोपी सुशांत खंडारे याने पोलीस चौकशीदरम्यान २५ जुलै रोजी दिली. दरम्यान, या प्रकरणात सहायक शिक्षकासह आणखी एका आरोपीला अटक केल्याने या प्रकरणातील आरोपींची एकूण संख्या तीन झाली आहे.
केंद्रप्रमुख चंद्रकांत कानडे, अमानी जि.प. शाळेचे मुख्याध्यापक विजय बोरकर, तत्कालिन मुख्याध्यापक गजानन इंगळे हे अन्य शिक्षकांसह अमानी जिल्हा परिषद शाळेत २४ जुलै रोजी नेहमीप्रमाणे बसलेले असताना, सकाळी १०:३० च्या सुमारास आरोपी सुशांत समाधान खंडारे या युवकाने मुख्याध्यापकाच्या कार्यालयात प्रवेश करीत मुख्याध्यापक विजय बोरकर यांच्या दिशेने पिस्तुलमधून गोळी झाडली. सुदैवाने हा हल्ल्यातून बोरकर बचावले. याप्रकरणी २४ जुलै रोजीच आरोपी सुशांत खंडारे याला ताब्यात घेण्यात आले. त्याची कसून चौकशी केली असता, गोळीबार प्रकरणाचा उलगडा झाला. आरोपी खंडारे याने पोलीस चौकशीदरम्यान दिलेल्या कबुलीनुसार, सहायक शिक्षक इंगळे हे याअगोदर अमानी येथेच मुख्याध्यापक म्हणुन काम पाहत होते. कालांतराने त्यांचेकडील मुख्याध्यापक पदाचा प्रभार काढल्याने ते सहकारी शिक्षकांवर नाराज होते. मुख्याध्यापकाला मारण्याकरीता शस्त्र खरेदीसाठी ४० हजार रुपयेही दिले. या प्रकरणात कैलास आत्माराम बनसोड ह.मु. मालेगाव (४५) यानेही मुख्याध्यापकाला मारण्यासाठी चिथावणी दिले, तुरूंगातून तुला सोडवून आणण्यासाठी आम्ही पूर्ण प्रयत्न करतो, असेही बनसोड याने सांगितले, अशी कबूली आरोपी इंगळे यांनी दिल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले. मुख्याध्यापकाला मारण्याचा कट रचल्यानंतर घटनेच्या दोन, तीन दिवसापूर्वीपासून गोळी झाडण्यासाठी संधीची वाट पाहत होतो आणि संधी मिळताच २४ जुलै रोजी गोळी झाडली, असे आरोपीने सांगितले.
सहायक शिक्षक गजानन महादेव इंगळे व कैलास आत्माराम बनसोड दोन्ही रा.मालेगाव यांनी आरोपी सुशांत खंडारे यास हाताशी धरुन मुख्याध्यापक विजय बोरकर यांना जिवाने मारण्याचा कट रचला, असे तपासाअंती उघड होत असल्याने उपरोक्त दोन्ही आरोपीला २५ जुलै रोजी मालेगाव पोलिसांनी ताब्यात घेतले. शनिवारी त्यांचेवर भादंवी कलम ३०७ (४), २५ आर्म अॅक्ट व सह कलम १२० ब नुसार गुन्हा दाखल केला. त्यांना न्यायालयात हजर केले असता २८ जुलैपर्यंत पोलीस कोठडी ठोठावण्यात आली आहे. या घटनेचा पुढील तपास ठाणेदार आधारसिंग सोनोने करीत आहेत.
दुसरे पिस्तुल जप्त
गोळी झाडणारा आरोपी हा मुंबई येथे वास्तव्य करीत होता. कोरोनामुळे तो गावी आला. त्याच्याकडे तीन पिस्तुल असल्याची चर्चा असून, २५ जुलै रोजी दुसरे पिस्तुल जप्त करण्यात आले. गोळीबार प्रकरण नेमके कोणते वळण घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.