गावाकडच्या कौटुंबिक प्रॉपर्टीच्या वादातून भाच्यावर गोळीबार; सात जण अटकेत
By ऑनलाइन लोकमत | Published: August 21, 2020 09:07 PM2020-08-21T21:07:10+5:302020-08-21T21:08:06+5:30
प्रॉपर्टीमध्ये भाचा अडथळा ठरत असल्यामुळे त्याचा कायमचा काटा काढण्याचा कट मामांनी रचला
भिवंडी - उत्तर प्रदेशमधील कर्नलगंज ,फुलपूर या मूळ गावातील घर व शेतजमिन प्रॉपर्टीच्या वादातून मामा मंडळीने एक भाचा व भाऊ,मेहुणे आदींना सोबत घेऊन प्रॉपर्टीमध्ये अडथळा ठरणाऱ्या भाच्याला कायमचा संपवण्याच्या इराद्याने बंदुकीच्या चार गोळ्या झाडून त्याला ठार मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना गुलजार नगर येथील याकूब शेठच्या बिल्डिंग समोर गुरुवारी रात्री घडली आहे.
अब्दुल सत्तार मोहम्मद इब्राहिम मंसुरी (65 रा. गुलजार नगर ) असे बंदुकीच्या गोळीबारात जखमी झालेल्या भाच्याचे नांव आहे. त्याचे उत्तर प्रदेशमधील मूळ गावातील आईच्या हिश्यावरून मामांसोबत घर आणि जमिनीच्या प्रॉपर्टीवरून गेल्या काही वर्षांपासून वाद सुरू आहे. सुमारे 10 कोटींची प्रॉपर्टी असल्याचे सांगण्यात येत आहे. त्या प्रॉपर्टीमध्ये अब्दुल सत्तार हा भाचा अडथळा ठरत आहे. त्यामुळे त्याचा कायमचा काटा काढण्याचा कट मामा सिराज उर्फ सोनू मुस्तफा मंसुरी ,वकील मंसुरी, शकील मंसुरी, इस्तीयाक मंसुरी यांनी रचून भाचा अब्दुल रज्जक मोहम्मद इब्राहिम मंसुरी,मेहुणे इसरार मोमीन, मुमताज अन्सारी आदींच्या साथीने अब्दुल मंसुरी हे त्यांच्या मेडिकल दुकानातून रात्री घरी जात असताना त्यांना रस्त्यात गाठून त्यांच्यावर चोरट्या बंदुकीतून चार गोळ्या झाडून त्यांना जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. या गोळीबाराच्या हल्ल्यात अब्दुल मंसुरी हे गंभीर जखमी झाल्याने त्यांना उपचारासाठी ठाण्यातील ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. त्यांच्यावर झाडण्यात आलेल्या गोळ्यांपैकी दोन गोळ्या मानेतून आरपार झाल्या आहेत तर एक गोळी पोटात व एक छातीमध्ये वर्मी लागल्याने त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे. या गोळीबाराच्या घटनेची माहिती मिळताच पोलीस उपायुक्त राजकुमार शिंदे व एसीपी नितीन कौसडीकर यांनी पोलीस पथकासह घटनास्थळी दाखल होऊन हल्लेखोरांना पकडण्याचे आदेश शांतीनगर पोलीस ठाण्यास दिले. त्यामुळे पोलीस निरीक्षक सचिन सांडभोर, पोलीस उपनिरीक्षक बाबासाहेब मुल्ला आदींच्या पोलीस पथकाने तात्काळ तपासाची चक्रे फिरवून हल्लेखोर अब्दुल रजाक मोहम्मद इब्राहिम मंसुरी व इसरार अहमद यार मोहम्मद मोमीन या दोन मुख्य हल्लेखोरांना ताब्यात घेऊन अटक करून शुक्रवारी न्यायालयात हजर केले असता त्यांना 27 ऑगष्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.तर अन्य पाच हल्लेखोरांना शांतीनगर पोलीसांनी ताब्यात घेतल्याचे सांगण्यात येत असून त्यांना शनिवारी न्यायालयात हजर केले जाणार आहे.