राजस्थानमधील व्यापाऱ्यावर गोळीबार; हत्येची सुपारी देणाऱ्याला डोंबिवलीतून अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: June 22, 2021 12:37 PM2021-06-22T12:37:45+5:302021-06-22T13:20:02+5:30
Crime News : राजस्थानमधील जयपूर जिल्ह्यातील गांधीपथ, अवधपुरी याठिकाणी कुटुंबासह वास्तव्याला असलेल्या आदित्य पन्नालाल जैन (वय 41) यांच्यावर 16 जूनला प्राणघातक हल्ला झाला.
कल्याण : राजस्थान येथील व्यापा-याला जीवे मारण्याची सुपारी देणा-याला डोंबिवलीतून अटक केली. कल्याण आणि उल्हासनगर गुन्हे अन्वेषण विभागाच्या पोलीसांनी ही संयुक्त कारवाई केली. राजस्थानमधील जयपूर जिल्ह्यातील गांधीपथ, अवधपुरी याठिकाणी कुटुंबासह वास्तव्याला असलेल्या आदित्य पन्नालाल जैन (वय 41) यांच्यावर 16 जूनला प्राणघातक हल्ला झाला. जैन हे त्यांची गाडी साफसफाई करत असताना दुचाकीवरून आलेल्या दोन अनोळखी व्यक्तींनी पिस्तुलातून त्यांच्यावर तीन गोळया झाडल्या. यातील एक गोळी जैन यांच्या हाताला लागून ते गंभीर जखमी झाले आहेत.
याबाबत त्यांनी तेथील करणी विहार पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल झाला होता. यावेळी पोलिसांनी केलेल्या चौकशीत आदित्य हे त्यांचे कुटुंबासह 2018 ते 2020 या कालावधीत डोंबिवलीत राहत होते. त्या दरम्यान डोंबिवली येथे राहणारा कमलेश शेषराव शिंदे हा नेहमी त्यांचे दुकानात येत जात असायचा. यात तो आदित्य यांच्या पत्नीवर एकतर्फी प्रेम करून तिला त्रास देऊ लागला. या त्रासाला कंटाळून आदित्य कुटुंबासह राजस्थान येथे राहण्यास गेले. परंतू कमलेशने आदित्य यांना जीवे ठार मारण्याकरिता एका व्यक्तीला सुपारी दिली त्यानुसार दोन व्यक्तींनी राजस्थान येथे जाऊन आदित्य जैन यांचेवर जीवघेणा हल्ला केला.
या गुन्ह्याचे तपासकामी सोमवारी राजस्थान पोलिसांचे पथक डोंबिवली येथे आले होते. त्यांनी दिलेल्या माहीतीवरून या गुन्हयाचा तपास कल्याण आणि उल्हासनगर गुन्हे अन्वेषण विभागाकडून संयुक्तपणो करण्यात आला. यात पोलीस उपनिरिक्षक नितीन मुदगुन, मोहन कळमकर, पोलीस हवालदार राजेंद्र घोलप, दत्ताराम भोसले, राजेंद्र खिल्लारे, मंगेश शिर्के, अजितसिंग राजपूत यांच्यासह उल्हानगर गुन्हे पोलीसांनी कसोशीने तपास करीत हत्येची सुपारी देणा-या कमलेशला डोंबिवली पश्चिमेतील देवीचा पाडा येथून ताब्यात घेतले. आरोपीला राजस्थान पोलीस पथकाच्या ताब्यात देण्यात आल्याची माहीती कल्याण गुन्हे अन्वेषण विभागाचे वरीष्ठ पोलीस निरिक्षक संजू जॉन यांनी दिली.