अर्धा तास कपडे पाहूनही खरेदी नाही; सेल्समनची सटकली अन्...
By ऑनलाइन लोकमत | Published: July 16, 2019 11:19 AM2019-07-16T11:19:00+5:302019-07-16T11:21:25+5:30
दादरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल; तपास सुरू
नोयडा: दुकानात बराच काळ कपडे पाहूनही खरेदी न करणं एका तरुणाला महागात पडलं. वेळेचा अपव्यय केल्याबद्दल दुकानातील सेल्समन संतापला. त्यानं संबंधित तरुणाला आणि त्याच्या कुटुंबाला शिवीगाळ करत मारहाणदेखील केली. यानंतर रस्त्यावरुन जाणाऱ्या लोकांनी कशीबशी तरुणाची आणि त्याच्या कुटुंबाची सुटका केली. रविवारी संध्याकाळी ही घटना घडली. या प्रकरणी पीडित कुटुंबानं दादरी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
ग्रेटर नोयडातील पाली गावचा रहिवासी असलेला अमित कुमार एका कुरियर कंपनीत काम करतो. रविवारी संध्याकाळी तो बहिण निकीता, सरोज आणि भाची टीनासोबत दादरीच्या बाजारातील एका कपड्याच्या दुकानात गेला होता. त्यावेळी त्यांनी खूप कपडे पाहिले. सेल्समन बराच वेळ त्यांना कपडे दाखवत होता. मात्र अमित यांच्या कुटुंबाला काहीच पसंत पडलं नाही आणि ते दुकानातून बाहेर जाऊ लागले. यावेळी संतापलेल्या सेल्समननं अमित यांच्या कुटुंबाला शिवीगाळ केली. अमितनं शिवीगाळीला विरोध करताच सेल्समननं त्याच्या इतर सहकाऱ्यांसोबत अमित आणि त्यांच्या कुटुंबाला मारहाण करत त्यांना धक्के देऊन दुकानातून बाहेर काढलं.
शिवीगाळ ऐकून शेजारचे दुकानदार कपड्यांच्या दुकानात पोहोचले. रस्त्यावरुन जाणाऱ्या काहींनी या वादात मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. मात्र यानंतरही सेल्समन आणि त्याच्या सहकाऱ्यांनी रस्त्यावरुन जात असलेल्या अमित यांचा पाठलाग केला. त्यांनी पुन्हा अमित आणि त्यांच्या कुटुंबाला मारहाण केली. यावेळी सेल्समन्सनी अमितच्या कुटुंबातील तरुणींसोबत गैरवर्तन केल्याचा आरोप आहे. अमित यांच्या कुटुंबानं या प्रकरणी दादरी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. सध्या या प्रकरणी पोलीस तपास सुरू आहे.