दुकानदाराने १५ मोबाईल वितरकांना घातला ९० लाखांचा गंडा
By ऑनलाइन लोकमत | Published: November 14, 2018 02:14 PM2018-11-14T14:14:00+5:302018-11-14T14:17:59+5:30
मोबाईल दुकान सुरु करुन त्यासाठी उधारीवर मोबाईल, टीव्ही घेऊन त्याचे पैसे न देताच १५ मोबाईल वितरकांना ९० लाख रुपयांचा गंडा घालून दुकानदार पळून गेल्याचे उघडकीस आले आहे़.
पुणे : मोबाईल दुकान सुरु करुन त्यासाठी उधारीवर मोबाईल, टीव्ही घेऊन त्याचे पैसे न देताच १५ मोबाईल वितरकांना ९० लाख रुपयांचा गंडा घालून दुकानदार पळून गेल्याचे उघडकीस आले आहे़.
हा प्रकार मार्च ते ८ नोव्हेंबर २०१८ दरम्यान बालाजीनगर येथील अनमोल टेलिकॉम येथे हा प्रकार घडला आहे़. याप्रकरणी सहकारनगर पोलिसांनी माधुसिंग गिरीधरसिंग राजपूत (रा़ बालाजीनगर) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे़.
याप्रकरणी संजय शहा (वय ५३, रा़ कॅम्प) यांनी फिर्याद दिली आहे़. याबाबत पोलिसांनी सांगितले की, शहा यांचे कॅम्पमध्ये दुकान असून त्यांचा पॉवर टेलिकॉम या नावाने नवीन मोबाईल वितरणाचा व्यवसाय आहे़. अनमोल टेलिकॉमचे मालक राजपूत यांनी बालाजीनगर येथे तात्पुरते मोबाईलचे दुकान सुरु केले़. विक्रीसाठी शहा आणि इतर १४ वितरकांकडून उधारीवर माल घेऊन काही दिवस व्यवस्थित व्यवहार करुन त्यांचा विश्वास संपादन केला़. त्यानंतर काही दिवसांनी शहा व इतर १४ मोबाईल वितरकांकडून त्यांनी वेगवेगळ्या कंपन्यांचे २ हजार ४३६ मोबाईल व २ हजार १५६ वेगवेगळी अक्सेसरीज आणि १२ टीव्ही असा ९० लाख ९६ हजार ३५५ रुपयांचा माल उधारीवर घेतला़. त्यानंतर राजपूत यांनी परस्पर दुकान बंद करुन ते पळून गेले़. राजपूत हे मूळचे राजस्थानमधील सिरोड जिल्ह्यातील राहणारे आहेत़ दुकानही बंद आणि संपर्क होत नसल्याने शेवटी शहा यांनी पोलिसांकडे धाव घेऊन फिर्याद दिली आहे़.