स्वस्तात सोन्याची बिस्किटे देण्याचे आमिष दाखविले; बनावट पोलिसांना बोलावून अडीच लाख लुटले
By ऑनलाइन लोकमत | Published: November 13, 2019 10:37 PM2019-11-13T22:37:22+5:302019-11-13T22:38:10+5:30
आरोपीने बाजारभावापेक्षा स्वस्तात सोने देण्याचे आमिष दाखवून त्यांना बोरिवली (पू.), सुकुरवाडी एसटी डेपो येथे भेटण्यास बोलावले.
मुंबई : स्वस्तात सोन्याची बिस्किटे देण्याचे आमिष दाखवून तसेच पोलीस छाप्याचा बनाव रचत फसवणूक करणाऱ्या टोळीच्या म्होरक्याला दहिसर येथून गुन्हे शाखेच्या युनिट - १२ च्या पोलिसांनी अटक केली आहे. इरफान अहमद मलिक (४७) असे आरोपीचे नाव असून त्याच्या टोळीतील्याच एकाला पोलिसांनी दहिसर येथून काही दिवसांपूर्वी अटक केली होती.
यातील फिर्यादींच्या मित्राला आरोपीने बाजारभावापेक्षा स्वस्तात सोने देण्याचे आमिष दाखवून त्यांना बोरिवली (पू.), सुकुरवाडी एसटी डेपो येथे भेटण्यास बोलावले. त्यानुसार त्या ठिकाणी फिर्यादी यातील एका इसमाला भेटले. त्याने फिर्यादींना रिक्षाने शांतीवन दहिसर पूर्व येथील हॉटेलमध्ये नेले. त्या ठिकाणी त्या इसमाने त्याच्या इतर साथीदारांना बोलावून घेतले. त्या वेळी त्या इसमांनी फिर्यादींना सोन्याची १० बिस्किटे दाखवली व त्याची खरेदी किंमत अडीच लाख रुपये फिर्यादीकडून घेतले. त्यानंतर सोन्याच्या बिस्किटांची खातरजमा करण्यासाठी त्या इसमांनी फिर्यादींना हॉटेलबाहेर आणले. त्या वेळी पैसे घेणारा इसम गाडी आणण्याच्या बहाण्याने तेथून निघून गेला. तर फिर्यादीसोबत असलेल्या दुसऱ्या एका इसमाला इतर दोन इसमांनी पोलीस असल्याचे सांगत त्याला रिक्षात बसवून घेऊन गेले. या प्रकारानंतर फिर्यादींना आपली फसवणूक झाल्याचे कळले.
त्यांनी कस्तुरबा मार्ग पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. युनिट - १२ च्या पोलिसांनी घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेज पाहणी करून यातील आरोपींची ओळख पटवली व खबऱ्यांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारावर दहिसर पूर्व परिसरातून मालवणी येथे राहणाऱ्या इरफान मलिक याला अटक केली. मलिक याच्या टोळीने अशा प्रकारे अनेक सोन्याच्या व्यापाऱ्यांची फसवणूक केली असून काही दिवसांपूर्वीच युनिट - १२ च्या पोलिसांनी दीपक भिमराव शिंदे (३३) याला दहिसर येथून अटक केली होती.