श्रद्धा हत्या प्रकरणात आरोपीविरोधात 6636 पानंचे आरोपपत्र, आफताबने केली वकील बदलण्याची मागणी...
By ऑनलाइन लोकमत | Published: January 24, 2023 04:48 PM2023-01-24T16:48:02+5:302023-01-24T16:48:20+5:30
पोलिसांनी दाखल केलेल्या आरोपपत्रात आफताबविरोधात अनेक गंभीर आरोप ठेवण्यात आले आहेत.
Shraddha Walkar Murder : बहुचर्चित श्रद्धा वालकर हत्येप्रकरणी दिल्ली पोलिसांनी आरोपी आफताब पुनावालाविरोधात 6636 पानांचे सविस्तर आरोपपत्र दाखल केले आहे. त्या आरोपपत्रात आरोपी आफताबवर अनेक गंभीर आरोप ठेवण्यात आले आहेत. मोठी गोष्ट म्हणजे खुद्द आफताबला ते आरोपपत्र त्याच्या वकिलाला दाखवायचे नाही. त्याने वकील बदलण्याचीही मागणी केली आहे. सध्या आफताबच्या न्यायालयीन कोठडीत 7 फेब्रुवारीपर्यंत वाढ करण्यात आली आहे.
या प्रकरणात दिल्ली पोलिसांनी 75 दिवसांनी हे आरोपपत्र दाखल केले आहे. आफताबची पोलिसांकडून नार्को टेस्ट करण्यात आली, पॉलीग्राफी टेस्ट करण्यात आली, अनेक प्रकारचे प्रश्न-उत्तरे विचारण्यात आली, त्यानंतर हे आरोपपत्र तयार करण्यात आले आहे. सुनावणीदरम्यान आरोपपत्र आपल्या वकिलाला दाखवू नये, तर त्याची प्रत त्याला उपलब्ध करून द्यावी, अशी आफताबची इच्छा होती. त्यावर न्यायदंडाधिकाऱ्यांनी या मागणीवर 7 फेब्रुवारीला दखल घेतली जाईल, असे स्पष्टपणे सांगितले आहे. त्यानंतरच आफताबला या प्रकरणाचे आरोपपत्र मिळू शकेल.
या प्रकरणाबाबत बोलायचे झाले तर, गेल्या वर्षी 18 मे रोजी आफताबने भांडणानंतर श्रद्धाची निर्घृण हत्या केली होती. आधी तिचा गळा दाबून हत्या केली, नंतर निर्दयीपणे तिच्या शरीराचे अनेक तुकडे केले आणि नंतर ते तुकडे जंगलात फेकून दिले. सहा महिन्यानंतर हे प्रकरणही उघडकीस आले आणि पोलिसांनी आफताबला गेल्या वर्षी 12 नोव्हेंबरला अटक केली. आफताब सध्या तिहार तुरुंगात बंद आहे.