आफताबनं २०२० मध्येही श्रद्धाला जीवे मारण्याचा केलेला प्रयत्न, चौकशीत नवा खुलासा! नेमकं काय घडलं होतं?
By ऑनलाइन लोकमत | Published: November 18, 2022 03:05 PM2022-11-18T15:05:19+5:302022-11-18T15:06:48+5:30
दिल्लीतील श्रद्धा वालकर हत्याप्रकरणाबाबत दर मिनिटाला नवनवीन खुलासे होत आहेत.
दिल्लीतील श्रद्धा वालकर हत्याप्रकरणाबाबत दर मिनिटाला नवनवीन खुलासे होत आहेत. श्रद्धा वालकरचे आता असेच काही फोटो समोर आले आहेत, ज्यावरून या हत्येचा संपूर्ण कट कसा रचला गेला याचा अंदाज लावला जात आहे. श्रद्धाचे जुने सहा फोटो समोर आले आहेत की यात श्रद्धाच्या चेहऱ्यावर काही जखमा दिसत आहेत. पहिल्या चित्रात क्रूरतेचा संपूर्ण अंदाज येतो. आफताबचं श्रद्धासोबत वारंवार भांडण होत असल्याचा हा पुरावा आहे.
चेहऱ्यावर जखमा, तीन दिवस रुग्णालयात उपचार; श्रद्धाचा नवा फोटो आला समोर
२०२० साली श्रद्धाला मुंबईतील रुग्णालयातही दाखल करण्यात आलं होतं. गेल्या अनेक दिवसांपासून श्रद्धा आणि आफताबमध्ये तणाव होता. दोघंही भांडण मिटवण्याचा प्रयत्न केला. उत्तराखंडलाही ते गेले होते. सूत्रांच्या माहितीनुसार, याआधीही आफताबने श्रद्धाला मारण्याचा प्रयत्न केला होता. २३ नोव्हेंबर २०२० रोजी श्रद्धाने मुंबईतील नालासोपारा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. या भांडणाबद्दल श्रद्धानं तिच्या मैत्रिणींनाही सांगितलं होतं. पोलिसांनी आफताबला पोलीस ठाण्यात बोलावलं असता त्यानं आत्महत्येची धमकी देत श्रद्धाला तक्रार परत घ्यायला लावली होती. दिल्ली पोलीसही या प्रकरणाचा तपास करत आहेत.
आफताब श्रद्धाला कशी बेदम मारहाण करायचा याचा अंदाज समोर आलेल्या फोटोवरुन लावता येईल. हे फोटो श्रद्धाच्या एका मित्रानं उपलब्ध करून दिले आहेत. पण लिव्ह-इनमध्ये राहताना या सगळ्याचा सामना करूनही तिला जिवंत राहायचं होतं आणि आफताबसोबत आनंदी राहायचं होतं. म्हणूनच या फोटोतही ती हसताना दिसते. तर तिच्या मानेपासून गालापर्यंत दुखापतीच्या खुणा दिसत आहेत.
३ डिसेंबर २०२० रोजी श्रद्धाला मुंबईतील रुग्णालयात दाखल करण्यात आलेलं
श्रद्धाला ३ डिसेंबर २०२० रोजी मुंबईतील रुग्णालयात दाखल करण्यात आले. पाठ आणि मणक्यामध्ये तिला तीव्र वेदना होत असल्यानं रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. वसईच्या ओझोन हॉस्पिटलमध्ये पाठदुखी, मानदुखी अशा तक्रारींसह तिला दाखल करण्यात आलं होतं. मित्रांनी दिलेल्या माहितीनुसार, श्रद्धाला आफताबने मारहाण केली आणि तो गांजाही घेत असे. दिल्लीला पोहोचण्याच्या काही दिवस आधी म्हणजेच ४ मे रोजी श्रद्धा आफताबसोबत उत्तराखंडमधील शिवपुरीजवळील वशिष्ठ गुहेत गेली होती. ही गुहा गंगा नदीच्या काठावर आहे, तिथून श्रद्धाने शेवटची व्हिडिओ रील पोस्ट केला होता.
श्रद्धा वालकर हत्या प्रकरण: पोलीस या ११ पुराव्यांच्या बळावर लढणार, ५ महत्वाचे साक्षीदारही मिळाले!
यानंतर, ११ मे रोजी श्रद्धाने एका कॅफेमध्ये तिचा एक फोटो पोस्ट केला होता. सूत्रांनुसार, हे कॅफे हिमाचलमध्ये आहे. तपासासाठी या ठिकाणांना भेट देऊनही पोलीस तपास करू शकतात. दिल्ली पोलिसांच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, श्रद्धाला आफताबसोबत दिल्लीला शिफ्ट व्हायचे होतं पण आफताब दिल्लीला शिफ्ट होण्याच्या विरोधात होता. आफताब बहुतांश वेळ त्याच्या फोनवर चॅट करत असे आणि जेव्हा श्रद्धाने विचारले की तो कोणासोबत चॅट करत आहे, तेव्हा तो उडवाउडवीची उत्तरं द्यायचा. या कारणावरून दोघांमध्ये भांडणं होत होती.
आफताब श्रद्धाला हिमाचल आणि उत्तराखंडला घेऊन गेला
श्रद्धा हत्येचा गुन्हा घडवण्यापूर्वी आफताब श्रद्धासोबत हिमाचल आणि उत्तराखंडला गेला होता, जेणेकरून छोट्या भांडणामुळे दोघांमधील अंतर दूर व्हावे. आता दक्षिण जिल्हा पोलिसांनी दिल्लीतील इतर जिल्ह्यांना गेल्या काही महिन्यांत त्यांच्या भागात शरीराचे कोणतेही अवयव आढळल्यास त्यांची माहिती देण्यास सांगितलं आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आफताब पूनावाला यानं १८ मे रोजी संध्याकाळी त्याची लिव्ह-इन पार्टनर श्रद्धा वालकर (२७) हिचा गळा दाबून खून केला आणि तिच्या मृतदेहाचे ३५ तुकडे केले. दक्षिण दिल्लीतील मेहरौली येथील त्याच्या राहत्या घरी हा सगळा प्रकार घडला. फ्रीज ठेवलेले श्रद्धाच्या मृतदेहाचे तुकडे तो सुमारे तीन आठवडे वेगवेगळ्या भागात फेकत राहिला.