Shraddha Murder Case: आफताबने ५४ हजार काढले आणि अडकला!
By ऑनलाइन लोकमत | Published: November 17, 2022 11:23 AM2022-11-17T11:23:09+5:302022-11-17T11:25:11+5:30
Shraddha Murder Case: आफताब याने श्रद्धाच्या बँक खात्यामधून ५४ हजार रुपये काढले आणि श्रद्धा बेपत्ता असतानाही पैसे कसे काढले, याचा तपास करणाऱ्या पोलिसांच्या जाळ्यात तो अडकला
नालासोपारा : वसईच्या माणिकपूर परिसरात राहणाऱ्या श्रद्धा वालकर (२७) हिची दिल्ली येथे तिचा प्रियकर आफताब (२८) याने गळा दाबून हत्या केल्यावर शरीराचे ३५ तुकडे केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या हत्याकांडात दररोज नवनवीन खुलासे होत आहेत. आरोपी आफताब याने श्रद्धाच्या बँक खात्यामधून ५४ हजार रुपये काढले आणि श्रद्धा बेपत्ता असतानाही पैसे कसे काढले, याचा तपास करणाऱ्या पोलिसांच्या जाळ्यात तो अडकला.
आरोपी आफताब याने ही रक्कम कधी व कुठे काढली याचा तपास आता पोलिस करीत आहेत. त्याने श्रद्धाची हत्या ही दुसऱ्या तरुणीसोबत असलेल्या प्रेमप्रकरणामुळे केल्याचेही समोर
येत आहे.
आफताब हा दुसऱ्या तरुणीसोबत चॅटिंग करायचा. त्याला श्रद्धाने विरोध दर्शविल्याने आरोपीच्या डोक्यात राग होता. त्यातूनच त्याने हे कृत्य केल्याचे बोलले जात आहे.
आफताबच्या प्रतीकात्मक पुतळ्याला फाशी
श्रद्धाची निर्घृणपणे हत्या करणाऱ्या आरोपी आफताबच्या प्रतीकात्मक पुतळ्याला वसईत फाशी देण्यात आली आहे. बुधवारी संध्याकाळी साडेचार वाजण्याच्या सुमारास फाशी दिलेला पुतळा अंबाडी ब्रिजखाली लावण्यात आला होता.
माणिकपूर पोलिसांना माहिती मिळताच घटनास्थळी पोहोचून तो पुतळा जप्त केला. हा पुतळा नेमका कोणी लावला याची माहिती नसून त्याचा शोध घेत असल्याचे माणिकपूरचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक संपतराव पाटील यांनी ‘लोकमत’ला सांगितले.