Shraddha Murder Case: श्रद्धा हत्याकांडापेक्षा अनुपमा हत्यकांड भयंकर; पतीनेच केले पत्नीच्या शरीराचे 72 तुकडे
By ऑनलाइन लोकमत | Published: November 15, 2022 02:36 PM2022-11-15T14:36:27+5:302022-11-15T14:37:06+5:30
shahdara murder case: सध्या देशभरात श्रद्धा हत्याकांडाची चर्चा होत आहे, पण डेहराडोनच्या अनुपमाचा यापेक्षाही भयंकररित्या खून झाला होता.
Shraddha Murder Case: पालघरच्या श्रद्धा वाकर नावाच्या तरुणीच्या हत्येने देशभरात खळबळ उडाली आहे. आफताब पूनावाला या तिच्या लिव्ह इन पार्टरने श्रद्धाच्या मृतदेहाचे 35 तुकडे केल्याचा धक्कादायक खुलासा झाला. ही खळबळजनक घटना दिल्लीत घडली. आरोपीने ज्याप्रकारे श्रद्धाचे 35 तुकडे केले, ते अतिशय भयावह आहे. या प्रकरणाने डेहराडूनच्या प्रसिद्ध अनुपमा गुलाटी हत्याकांडाची आठवण करून दिली आहे. 17 ऑक्टोबर 2010 रोजी डेहराडूनच्या शांत दून व्हॅलीमध्ये या घटनेपेक्षाही भयानक घटना घडली होती.
नेमकं काय झालं?
अनुपमा गुलाटी नावाच्या महिलेची तिचा पती राजेश याने हत्या करून मृतदेहाचे 72 तुकडे केले होते. त्यानंतर तो एक एक करून तुकडे लपवायचा. अनुपमाच्या कुटुंबीयांचे अनेक दिवसांपासून तिच्याशी बोलणे झाले नाही, यानंतर तिचा भाऊ सूरज 12 डिसेंबर 2010 रोजी दिल्लीहून डेहराडूनला पोहोचला. तिथे गेल्यानंतर त्याला बहिणीच्या हत्येची माहिती मिळाली. यानंतर पोलिसांनी आरोपीला अटक केली. या प्रकरणी 2011 मध्ये डेहराडून पोलिसांनी कोर्टात आरोपपत्र दाखल केले होते.
हत्या का आणि कशी केली?
दिल्लीस्थित अनुपमा यांनी 1999 मध्ये राजेश गुलाटीसोबत प्रेमविवाह केला होता. राजेश हा व्यवसायाने सॉफ्टवेअर इंजिनिअर होता. लग्नानंतर दोघेही 2000 साली अमेरिकेला गेले. तेथून भारतात परतल्यानंतर ते आपल्या दोन मुलांसह प्रकाश नगर, डेहराडून येथे स्थायिक झाले. भारतात परतल्यानंतर दोघांमध्ये वाद सुरू झाला. खुनाच्या दिवशीही दोघांमध्ये भांडण झाले होते. यादरम्यान अनुपमाचे डोके पलंगाच्या कोपऱ्यात आदळले, यानंतर राजेशने अनुपमाच्या तोंडावर उशी ठेवून तिचा खून केला.
मृतदेहाची अशी विल्हेवाट लावली
पोलिसांनी राजेशची चौकशी केली असता, हॉलिवूड चित्रपट पाहून अनुपमाच्या हत्येची योजना आखल्याचे समोर आले. आधी त्याने अनुपमाची हत्या केली, त्यानंतर गुन्हा लपवण्यासाठी डीप फ्रीझर विकत घेऊन त्यात अनुपमाचा मृतदेह ठेवला. यानंतर मृतदेहाचे 72 तुकडे केले आणि हळूहळू मसुरीच्या जंगलात फेकणे सुरू केले. यादरम्यान, अनुपमाच्या भावाला सत्य समजले. त्याच्या तक्रारीवरून पोलिसांनी राजेशला अटक करून न्यायालयात हजर केले. सुनावणीनंतर न्यायालयाने जन्मठेप आणि 15 लाखांचा आर्थिक दंडही ठोठावला.