श्रद्धा हत्याकांड : तो श्रद्धाला सिगारेटचे चटके द्यायचा; दोघांच्या मित्रांचे जबाब साकेत न्यायालयात नोंदवले
By ऑनलाइन लोकमत | Published: November 26, 2022 06:53 AM2022-11-26T06:53:38+5:302022-11-26T06:54:11+5:30
या दोघांचा एक मित्र बंगळुरूत राहतो. त्याची चौकशी दिल्ली पोलिस तेथे जाण्याच्या तयारीत आहेत. दिल्ली पोलिस या मित्राला चौकशीसाठी दिल्लीलाही बोलवू शकतात, असेही बोलले जात आहे.
नवी दिल्ली : श्रद्धा वालकर हत्या प्रकरणात ती व आफताबच्या मित्रांनी गुरुवारी साकेत न्यायालयात जबाब नोंदविला. आफताब श्रद्धाला मारहाण करायचा, जीवे मारण्याची धमकी द्यायचा. याबाबत श्रद्धाने अनेकदा सांगितले होते, असे त्यांनी सांगितले. दरम्यान, एका मित्राने आफताबने तिला सिगारेटने चटकेही दिले होते. मात्र, ती त्याला एक संधी देऊ इच्छित होती, असे सांगितले.
दरम्यान, या दोघांचा एक मित्र बंगळुरूत राहतो. त्याची चौकशी दिल्ली पोलिस तेथे जाण्याच्या तयारीत आहेत. दिल्ली पोलिस या मित्राला चौकशीसाठी दिल्लीलाही बोलवू शकतात, असेही बोलले जात आहे. दिल्ली पोलिसांच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, श्रद्धाचा एक मित्र व आफताबच्या मित्राला नोटीस देऊन दिल्लीला बोलावण्यात आले होते. गेल्या काही दिवसांत दिल्ली पोलिसांनी ५ मोठे चाकू जप्त केले असून, ते तपासासाठी फॉरेन्सिक टीमकडे पाठविले आहेत. श्रद्धाचे शिर सापडण्याची शक्यता जवळपास संपली असून, जंगली प्राण्यांनी खाल्ल्याचा पोलिस अधिकाऱ्यांचा संशय आहे.’
नात्याबाबत विचारताच त्याने मागितले पाणी
गुरुवारी रोहिणीच्या फॉरेन्सिक लॅबमध्ये आफताबची पॉलीग्राफी चाचणी सुरू झाल्यानंतर त्याने पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. श्रद्धासोबतच्या नात्यावर प्रश्न विचारताच तो थोडा अस्वस्थ झाला व पाणी मागू लागला. चाचणीत त्याला ४० ते ५० प्रश्न विचारण्यात आले. नियोजित पद्धतीने हत्या केली की रागातून? मृतदेहाचे तुकडे करण्याचा व फेकण्याचा निर्णय का घेतला? मृतदेहाचे तुकडे करण्यासाठी कोणत्या शस्त्रांचा वापर केला? शस्त्रे कुठे लपविली? हे प्रश्न त्याला विचारले. हे प्रश्न हिंदीत विचारले आणि त्याने याची इंग्रजीतून उत्तरे दिल्याचेही कळते.