Shraddha Murder Case:फॉरेन्सिक तपासणीत मोठा खुलासा; आफताबच्या बाथरुममध्ये मिळाले रक्त
By ऑनलाइन लोकमत | Published: November 22, 2022 02:10 PM2022-11-22T14:10:13+5:302022-11-22T14:11:47+5:30
मुंबईच्या श्रद्धा वायकर हत्याकांड प्रकरणात रोज नवे खुलासे होत आहेत. आता दिल्ली पोलिसांना या प्रकरणी मोठा पुरावा मिळाला आहे.
मुंबईच्या श्रद्धा वायकर हत्याकांड प्रकरणात रोज नवे खुलासे होत आहेत. आता दिल्ली पोलिसांना या प्रकरणी मोठा पुरावा मिळाला आहे. आफताब राहत असलेल्या फ्लॅटमधील बाथरूममध्ये रक्त आढळले आहे.
फॉरेन्सिक तपासणीत आफताबच्या बाथरूममध्ये रक्त सापडल्याचे समोर आले आहे. आफताबच्या बाथरुमच्या टाइल्सवर रक्ताचे डाग आढळून आले आहेत. यापूर्वी किचनमधून काही रक्ताचे डागही आढळून आले होते. एफएसएलच्या तपासाशिवाय पोलिसांनी अधिक तंत्रज्ञानाने सज्ज असलेल्या सीएफएसएलकडून पुरावेही गोळा केले होते. मात्र, सीएफएसएलचा अहवाल येण्यासाठी दोन आठवडे लागणार आहेत.
आफताबची नार्को टेस्ट करण्यापूर्वी पॉलिग्राफ टेस्ट होणार आहे. साकेत न्यायालयाने सोमवारी परवानगी दिली. दिल्ली पोलिसांनी यासाठी तयारी पूर्ण केली आहे. गरजेनुसार आफताबची पॉलीग्राफ चाचणी केव्हाही करता येणार आहे. डॉक्टर आणि तज्ज्ञांची टीमही पूर्णपणे तयार आहे. आफताबची पॉलीग्राफ चाचणी केल्यानंतर नार्को चाचणी केली जाईल. आफताबने दोन्ही चाचण्यांसाठी संमती दिली आहे.
भयंकर! आफताबच्या संपर्कात आलेल्या 'त्या' मुलींचं नेमकं काय झालं?; श्रद्धा हत्याकांडात 'नवा ट्विस्ट'
काल आफताबला विशेष न्यायालयात हजर करण्यात आले होते. त्यावेळी त्याने श्रद्धाची हत्या केल्याची कबुली दिली आहे. रागाच्या भरात श्रद्धाची हत्या केली. त्यादिवशी मी जे काही केलं ती Heat Of The Moment होती, असं आफताबने न्यायालयातील न्यायाधीशांना म्हटलं आहे. तसेच आफताबच्या कोठडीत ४ दिवसांची वाढ देखील करण्यात आली आहे.
आफताबची सध्या पोलिसांकडून चौकशी सुरु आहे. याचदरम्यान त्याने श्रद्धाचं शिर एका तलावात टाकल्याचे चौकशीदरम्यान सांगितले. त्यानंतर पोलिसांनी छतरपूर जिल्ह्यात मैदान गढी तलावातील पाणी उपसणे सुरू केले होते. याशिवाय पाणबुड्यांना पाचारण करण्यात आले होते. अख्खा तलाव रिकामा केला, मात्र श्रद्धाचे शिर अद्याप सापडलेले नाही.
दरम्यान, आफताबने अतिशय शांत डोक्याने १८ मे रोजी श्रद्धा हिची हत्या केली होती. यानंतर ५ जून रोजी आफताबने वसईतील एव्हरशाइन येथील भाड्याच्या घरातील सामान दिल्लीत मागवले होते. मीरा रोड येथील एका कंपनीला हे काम दिले होते. कंपनीच्या गोविंद यादव याची दिल्ली पोलिसांनी चौकशी करून त्याचा जबाब नोंदवून घेतला आहे. त्याने सामान शिफ्ट करताना झालेल्या व्यवहाराची पावती पोलिसांना दिली असल्याची माहिती मिळत आहे. दिल्लीला सामान शिफ्ट करण्यासाठी २० हजार रुपये आफताबने गुगल-पेद्वारे भरले होते. एक आठवड्यात आम्ही सामान दिल्लीला पाठवले, असे यादव याने पोलिसांना सांगितले.