श्रद्धा हत्याकांड : रागाच्या भरात श्रद्धाला मारले; आफताबची कोर्टात कबुली, पॉलिग्राफ चाचणीला परवानगी
By ऑनलाइन लोकमत | Published: November 23, 2022 07:52 AM2022-11-23T07:52:39+5:302022-11-23T07:54:03+5:30
हत्येनंतर मृतदेह कापण्यासाठी वापरलेले करवत व ब्लेड गुरुग्राममध्ये फेकून दिल्याचे सांगण्यात आले. त्याचा शोध पुन्हा घेतला जाणार आहे.
नवी दिल्ली : लिव्ह-इन-पार्टनर श्रद्धा वालकरची हत्या करून मृतदेहाचे तुकडे केल्याप्रकरणी आफताब अमीन पूनावाला याला दिल्ली कोर्टाने मंगळवारी चार दिवसांची पोलीस कोठडी वाढवून देत त्याच्या पॉलिग्राफ चाचणीस परवानगी दिली. त्याने हा गुन्हा रागाच्या भरात केल्याची कबुली दिल्याचे त्याच्या वकिलांनी सांगितले.
आफताबला महानगर दंडाधिकारी अविरल शुक्ला यांच्यासमोर व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे हजर करण्यात आले. आफताबला श्रद्धाचे अवयव शोधण्यासाठी दोन तलावांजवळ नेण्यात येणार आहे, त्यापैकी एक मेहरौलीच्या जंगलात आणि दुसरा येथील मैदानगढीमध्ये आहे. जेथे त्याने श्रद्धाचे अवयव फेकले अशा एका तलावाचे रेखाचित्रदेखील दिल्याची माहिती वकिलांनी दिली.
हत्येनंतर मृतदेह कापण्यासाठी वापरलेले करवत व ब्लेड गुरुग्राममध्ये फेकून दिल्याचे सांगण्यात आले. त्याचा शोध पुन्हा घेतला जाणार आहे.
चार दिवसांची कोठडी
पोलिस अधिकाऱ्याने सांगितले की, तपास अद्याप सुरू असल्याने त्याच्या पोलिस कोठडीत वाढ करण्याची मागणी केली. आरोपीला आणखी चार दिवसांची पोलिस कोठडी दिली. त्यामुळे अधिक पुरावे गोळा करण्यास मदत होईल.
सीबीआय तपासाची याचिका फेटाळली
हे प्रकरण दिल्ली पोलिसांकडून सीबीआयकडे हस्तांतरित करण्याची मागणी करणारी जनहित याचिका कोर्टाने फेटाळली. कोर्टाने आदेश देताना याचिकाकर्त्यावर दंडही आकारला आहे.