श्रद्धाचे शीर कापून फ्रीजमध्ये ठेवले; दररोज फ्रीज उघडून तिचा चेहरा पाहायचा, चौकशीत खुलासा...
By ऑनलाइन लोकमत | Published: November 15, 2022 04:56 PM2022-11-15T16:56:27+5:302022-11-15T16:57:28+5:30
महाराष्ट्रातील श्रद्धा नावाच्या तरुणीची दिल्लीत आफताब नावाच्या तरुणाने हत्या केली, या हत्याकांडाने देशात खळबळ उडाली आहे.
नवी दिल्ली:दिल्लीतील श्रद्धा हत्याकांडात नवनवीन माहिती समोर येत आहे. आता समोर आलेल्या ताज्या माहितीनुसार, आरोपी आफताब अमीन पूनावालाने खून केल्यानंतर श्रद्धाचे शीर कापून फ्रीजमध्ये ठेवले होते. तसेच, तो दररोज श्रद्धाचा चेहरा पाहत होता. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, आफताब त्याच खोलीत झोपायचा, ज्या खोलीत त्याने श्रद्धाच्या मृतदेहाचे तुकडे केले होते.
मृतदेहाचे 35 तुकडे केले
हत्येचा कट रचण्यासाठी आफताबने दिल्लीतील छतरपूर भागात भाड्याने घर घेतले होते का, याचा तपास दिल्ली पोलीस करत आहेत. सहा महिन्यांपूर्वी त्याने लिव्ह-इन गर्लफ्रेंड श्रद्धा वॉकरची हत्या आणि मृतदेहाचे 35 तुकडे केले होते. याप्रकरणी पोलिसांनी त्याला अटक केली असून, चौकशीदरम्यान तो नवनवीन खुलासे करत आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आफताब आणि श्रद्धा यांच्यात वारंवार भांडणे होत होती.
श्रद्धाची गळा दाबून हत्या केली
पोलिस सूत्रांनी एएनआय या वृत्तसंस्थेला सांगितले की, आफताब आणि श्रद्धा एका डेटिंग अॅपद्वारे भेटले होते. ते दोघे 2019 पासून रिलेशनशिपमध्ये होते आणि या वर्षी दिल्लीत एकत्र राहायला आले होते. यापूर्वी दोघेही महाराष्ट्रात राहत होते. 18 मे रोजी छतरपूर येथील त्याच फ्लॅटमध्ये त्याने श्रद्धाची गळा दाबून हत्या केली होती. हत्येच्या काही दिवस आधी हे घर भाड्याने घेतल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे. हत्येनंतर त्याने श्रद्धाच्या मृतदेहाचे 35 तुकडे केले आणि दररोज पहाटे 2 वाजता, हे तुकडे विविध ठिकाणी फेकत होता.
घरातून पोलिसांनी काही हाडेही जप्त केली
नोव्हेंबरमध्ये पालघर येथील रहिवासी असलेले श्रद्धाचे वडील विकास मदन वॉकर यांनी मुंबई पोलिसांशी संपर्क साधला आणि मुलगी हरवल्याची तक्रार दाखल केली. तपासादरम्यान असे आढळून आले की आफताब आणि श्रद्धा दिल्लीतील छतरपूर पहाडी भागात भाड्याच्या घरात राहत आहेत. तपासादरम्यान पोलिसांनी आफताबचा शोध घेऊन त्याला अटक केली. चौकशीत आफताबने गुन्ह्याची कबुली दिली. लग्नासाठी श्रद्धाच्या दबावामुळे त्यांच्यात भांडण होत असे आणि यातूनच आफताबने श्रद्धाची हत्या केली. भाड्याच्या घरातून पोलिसांनी काही हाडेही जप्त केली असून, उर्वरित मृतदेह शोधण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.