श्रद्धा हत्याकांड : तीन महत्त्वाची सीसीटीव्ही फुटेज पोलिसांच्या हाती
By ओमकार संकपाळ | Published: November 26, 2022 07:13 AM2022-11-26T07:13:18+5:302022-11-26T07:14:10+5:30
प्रत्येक फुटेज काळजीपूर्वक पाहून त्याच्या बारकाईने नोंदी करण्याचे, ते फुटेज अस्सल असल्याचे सिद्ध करण्याचे आव्हान आमच्यापुढे असल्याचे अधिकाऱ्याने सांगितले.
मुंबई : हत्येनंतर श्रद्धाच्या मृतदेहाचे तुकडे करून आफताबने ते नव्या फ्रीजमध्ये ठेवले होते. नंतर रोज तो मध्यरात्री त्यांची विल्हेवाट लावत होता. तो ज्या मार्गाने जात होता, त्यावरील तीन महत्त्वाची सीसीटीव्ही फुटेज पोलिसांच्या हाती लागली आहेत. दिल्ली पोलिसांनी आतापर्यंत शेकडो तासांचे सीसीटीव्ही फुटेज गोळा केले आहे. त्यांची छाननी करण्याचे, त्याचे विश्लेषण करण्याचे काम सुरू आहे.
आफताबने दररोज विशिष्ट वेळी मृतदेहाची विल्हेवाट लावण्याचे कामही मुद्दाम केल्याचे पोलिसांच्या १२ दिवसांच्या तपासात दिसले. तो ठराविक वेळी, एकसारखे दिसणारे कपडे-बॅग घेऊन मुद्दाम जात होता. त्यामुळे सीसीटीव्ही फुटेज पुरावा म्हणून गोळा करून सादर करायचे झाले तर ते एकसारखे दिसेल. ते एकच फुटेज वाटेल आणि तपास अधिकारी खोटे पुरावे सादर करत असल्याचा प्रत्यारोप करता येईल, असे दिल्ली पोलिसांच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. त्यामुळे प्रत्येक फुटेज काळजीपूर्वक पाहून त्याच्या बारकाईने नोंदी करण्याचे, ते फुटेज अस्सल असल्याचे सिद्ध करण्याचे आव्हान आमच्यापुढे असल्याचे अधिकाऱ्याने सांगितले.