श्रद्धाच्या शरीराचे 10 तुकडे सापडले, पोलिसांनी आरोपीला त्याच जंगलात नेले; फॉरेंसिक टीम घटनास्थळी
By ऑनलाइन लोकमत | Published: November 15, 2022 05:55 PM2022-11-15T17:55:30+5:302022-11-15T17:55:37+5:30
श्रद्धाचे वडील विकास वॉकर यांनी आरोपी आफताब अमीन पूनावाला याला फाशी देण्याची मागणी केली आहे.
नवी दिल्ली: हृदय पिळवटून टाकणाऱ्या श्रद्धा वॉकर खून प्रकरणात सीबीआय फॉरेन्सिक टीम फ्रिज आणि इतर पुरावे तपासण्यासाठी दिल्लीतील मेहरौली पोलीस ठाण्यात पोहोचली आहे. याप्रकरणी आतापर्यंत पोलिसांच्या तपासात अनेक धक्कादायक खुलासे झाले आहेत. दरम्यान, दिल्ली पोलिसांनी मंगळवारी आरोपी आफताब अमीन पूनावालाला त्या जंगलात नेले, जिथे त्याने श्रद्धाच्या शरीराचे तुकडे फेकून दिले होते. शोध मोहीम तीन तास चालली असून, श्रद्धाच्या मृतदेहाचे 10 तुकडे सापडले आहेत.
श्रद्धाचे वडील विकास वॉकर यांनी मंगळवारी 28 वर्षीय आरोपी आफताब अमीन पूनावाला याला फाशी द्यावी, अशी मागणी केली आणि या घटनेमागे ‘लव्ह जिहाद’ असल्याचा संशयही व्यक्त केला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आफताब आणि श्रद्धा यांची मुंबईत नोकरीदरम्यान 'बंबल' डेटिंग अॅपद्वारे भेट झाली. पोलीस आता डेटिंग अॅप्सवरून आफताबच्या प्रोफाइलचीही तपासणी करत आहेत. जेव्हा श्रद्धाच्या शरीराचे अवयव त्याच्या घरात होते, तेव्हा त्याने इतर मुली किंवा महिलांसोबत घरात संबंध ठेवल्याचा खुलासाही पोलिसांनी केला आहे.
श्रद्धा लग्नासाठी आपताबवर दबाव टाकत होती, ज्यामुळे त्या दोघांमध्ये वारंवार भांडणे होत होती. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, 18 मे रोजी भांडण वाढले आणि आफताबने श्रद्धा तिच्या छातीवर बसवून गळा दाबला. आफताबने पोलिसांना सांगितले आहे की, श्रद्धाच्या शरीराचे तुकडे केल्यानंतर रक्ताचे डाग साफ करण्यासाठी सल्फर हायपोक्लोराईटचा वापर केला होता. तसेच, पुरावे नष्ट करण्यासाठी त्याने विविध हॉलिवूड वेब सीरिज आणि चित्रपट पाहिले. तिथूनच त्याला पुरावे नष्ट करण्याची आणि शरीराचे तुकडे करुन फ्रीजमध्ये ठेवण्याची कल्पना सुचली.