Shraddha Walker Murder Case: 'जे काही घडलं ती Heat Of The Moment'; आफताबचं न्यायालयात स्पष्टीकरण, कबुलीही दिली!
By ऑनलाइन लोकमत | Published: November 22, 2022 10:47 AM2022-11-22T10:47:43+5:302022-11-22T10:53:15+5:30
Shraddha Walker Murder Case: श्रद्धा हत्याकांडमधील आरोपी आफताबला न्यायालयात हजर करण्यात आले होते.
नवी दिल्ली- संपूर्ण देशाला हादरवून सोडणाऱ्या श्रद्धा हत्याकांड (Shraddha Walker Murder Case) प्रकरणी एकामागून एक नवीन खुलासे होत आहेत. हत्या करणारा आरोपी आफताब अमीन पूनावालाची (Aftab Poonawalla) क्रूरता पाहून सर्वांनाच हादरवून सोडले आहे.
आफताबला विशेष न्यायालयात हजर करण्यात आले होते. त्यावेळी त्याने श्रद्धाची हत्या केल्याची कबुली दिली आहे. रागाच्या भरात श्रद्धाची हत्या केली. त्यादिवशी मी जे काही केलं ती Heat Of The Moment होती, असं आफताबने न्यायालयातील न्यायाधीशांना म्हटलं आहे. तसेच आफताबच्या कोठडीत ४ दिवसांची वाढ देखील करण्यात आली आहे.
आफताबचा जबाब अन् संपूर्ण यंत्रणा कामाला लागली; अख्खा तलाव रिकामा केला, पण...
आफताबची सध्या पोलिसांकडून चौकशी सुरु आहे. याचदरम्यान त्याने श्रद्धाचं शिर एका तलावात टाकल्याचे चौकशीदरम्यान सांगितले. त्यानंतर पोलिसांनी छतरपूर जिल्ह्यात मैदान गढी तलावातील पाणी उपसणे सुरू केले होते. याशिवाय पाणबुड्यांना पाचारण करण्यात आले होते. अख्खा तलाव रिकामा केला, मात्र श्रद्धाचे शिर अद्याप सापडलेले नाही.
दरम्यान, आफताबने अतिशय शांत डोक्याने १८ मे रोजी श्रद्धा हिची हत्या केली होती. यानंतर ५ जून रोजी आफताबने वसईतील एव्हरशाइन येथील भाड्याच्या घरातील सामान दिल्लीत मागवले होते. मीरा रोड येथील एका कंपनीला हे काम दिले होते. कंपनीच्या गोविंद यादव याची दिल्ली पोलिसांनी चौकशी करून त्याचा जबाब नोंदवून घेतला आहे. त्याने सामान शिफ्ट करताना झालेल्या व्यवहाराची पावती पोलिसांना दिली असल्याची माहिती मिळत आहे. दिल्लीला सामान शिफ्ट करण्यासाठी २० हजार रुपये आफताबने गुगल-पेद्वारे भरले होते. एक आठवड्यात आम्ही सामान दिल्लीला पाठवले, असे यादव याने पोलिसांना सांगितले.
'आफताब गळा दाबून मारहाण करतोय'; दोन वर्षांपूर्वीच श्रद्धाने पोलीस ठाण्यात तक्रार केलेली, पण...
आफताबची नार्को चाचणी लांबणीवर -
आफताबची नार्को चाचणी तूर्त टळली आहे. नार्कोपूर्वी आफताबची पॉलीग्राफिक चाचणी होईल. ज्यासाठी त्याची संमती आवश्यक आहे, त्याबद्दल पोलिसांना कळविले आहे, असे फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरीने स्पष्ट केले आहे. या चाचणीत प्रश्न विचारून गुन्हेगाराची रक्तदाब, नाडी, श्वासोच्छ्वास आदींची मोजणी करून त्याद्वारे त्याची मानसिकता याद्वारे तपासली जाते.
त्याने काम केलेल्या हॉटेल ध्येही चौकशी-
आफताबने सुरुवातीला मुंबईच्या एका पंचतारांकित हॉटेलमध्ये काम केले होते. तेथील त्याची वर्तणूक कशी होती, याची चौकशी दिल्ली पोलिसांनी केली. ट्रेनी शेफ म्हणून तो कसा वागत होता, याबाबत चौकशी करताना त्यांनी त्या हॉटेलमधील काही स्टाफच्या जबान्याही नोंदविल्या. मात्र त्याबाबतचा तपशील मिळालेला नाही.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"