कधी विसराळूपणाचं नाटक तर कधी स्वत:चेच जबाब बदलणं... आफताबने चौकशीत पोलिसांना टाकलं गोंधळात
By ऑनलाइन लोकमत | Published: November 25, 2022 01:12 PM2022-11-25T13:12:24+5:302022-11-25T13:13:03+5:30
Shraddha Case, Aftab Enquiry: सध्या देशात श्रद्धा वालकर हत्या प्रकरणावर बरीच चर्चा होत आहे. याच प्रकरणातील आरोपी आफताब पूनावाला याची दिल्ली पोलिसांकडून चौकशी केली जात आहे.
Shraddha Walker Murder Case, Aftab Enquiry: श्रद्धा हत्याकांडातील आरोपी आफताबची सध्या दिल्लीपोलिसांकडून कसून चौकशी केली जात आहे. आज पुन्हा एकदा पॉलिग्राफी चाचणी होऊ शकते. पोलिसांनी गुरुवारी ८ तास आफताबची पॉलीग्राफी चाचणी केली होती. यावेळी श्रद्धा आणि तिच्या हत्येशी संबंधित सुमारे ५० प्रश्न विचारण्यात आले. मात्र आफताबकडून उत्तर मिळवणे दिल्ली पोलिसांना कठीण गेल्याचे समजत आहे. आफताब अजूनही दिल्ली पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. तो कधी विसराळूपणाचे नाटक करतो, तर कधी मुद्दाम अशी उत्तरे देतो की पोलिसांचा गोंधळ उडतो.
आफताब मुद्दाम 'गजनी' स्टाईलमध्ये पोलिसांची दिशाभूल करत आहे. तो कधी-कधी विसरण्याचे नाटक करतो तर मग कधीकधी आपलीच दिलेली विधाने बदलत असतो, जेणेकरून या प्रकरणात पोलिसांना गोंधळात टाकता येईल. आफताबने केलेला गुन्हा अतिशय गंभीर असल्याने त्याच्याकडून शक्य तितकी माहिती काढून घेण्याचा प्रयत्न केला जता आहे. परंतु, सतत आपली विधाने फिरवणारा आफताब पोलिसांना ताकास तूस लागू देत नाहीये, अशी माहिती सांगण्यात येत आहे. आफताब सातत्याने आपली विधाने बदलत आहे. न्यायालयात त्याच्याविरोधातील आरोप सिद्ध करणे कठीण जावे यासाठी तो अशाप्रकारे वागत असल्याचा अंदाज व्यक्त केला जातोय.
आफताबने पोलिसांना सांगितले की, त्याने श्रद्धाच्या शरीराचे ३५ तुकडे केले. आता १४ दिवसांची त्याची पोलीस कोठडी संपणार असून, अद्याप एकही तुकडा सापडलेला नाही. आफताबने नियोजनबद्ध पद्धतीने श्रद्धाची हत्या केल्याचे पोलिस तपासात उघड झाले आहे. पण कोर्टात त्याने क्षणातच श्रद्धाची हत्या केल्याचे सांगितले.
पोलिसांना पुरावे मिळाले नाहीत
आफताबची चौकशी केल्यानंतर हत्येचे संपूर्ण चित्र पोलिसांसमोर आहे. आफताबने पोलिसांना श्रद्धाच्या मृतदेहाचे तुकडे आणि हत्येसाठी वापरलेली हत्यारे ज्या ठिकाणी फेकली होती ते सांगितले. पोलिसांनी मेहरौली जंगलातून निश्चितपणे काही हाडे जप्त केली आहेत. आफताबच्या घरात रक्ताचे काही डागही सापडले आहेत. मात्र आजतागायत पोलिसांना कोणताही पुरावा सापडलेला नाही ज्यामुळे पोलिसांना हत्येबाबत थेअरी मांडून ती न्यायालयात सिद्ध करता येत नसल्याचे दिसतेय. जर श्रद्धाच्या हाडांची डीएनए चाचणीत पुष्टी झाली नाही, तर आफताबच खूनी असल्याचे सिद्ध करणे दिल्ली पोलिसांना प्रचंड कठीण जाईल.