Shraddha Walker Murder Case: श्रद्धा प्रकरणात मोठा ट्विस्ट: आफताबने गुन्हा कबुल केलेला नाही, सरकारी वकिलांचा खुलासा
By ऑनलाइन लोकमत | Published: November 22, 2022 06:20 PM2022-11-22T18:20:46+5:302022-11-22T18:21:12+5:30
Shraddha Walker Case Update: आफताबच्या पोलीस कोठडीत चार दिवसांची वाढ करण्यात आली आहे. मंगळवारी साकेत न्यायालयात त्याला व्हिडीओ कॉन्फरन्सींगद्वारे हजर करण्यात आले.
श्रद्धा वालकरच्या हत्येप्रकरणी संशयित आरोपी आफताब पुनावाला याला आज दिल्ली पोलिसांनी न्यायालयात हजर केले. यावेळी आफताबला त्याच्या कुटुंबीयांना भेटण्याची परवानगी देण्यात आली. तसेच आफताबने श्रद्धाची हत्या केल्याचे कबुल केल्याचेही मीडिया रिपोर्टमध्ये सांगण्यात आले होते. परंतू, आफताबला बाजू मांडण्यासाठी देण्यात आलेल्या सरकारी वकिलांनी याबाबत खुलासा केला आहे.
आफताबने न्यायालयात लिव्ह इन पार्टनर श्रद्धा वालकरची हत्या करण्याचा गुन्हा कबुल केलेला नाही, असे आरोपीचे सरकारी वकील म्हणाले. आफताबच्या विरोधात सध्याचा गुन्हा हा परिस्थितीजन्य पुराव्यांनुसार आहे, जो त्याची मदत करू शकतो,असे आफताबला न्यायालयाने दिलेले वकील अविनाश कुमार यांनी म्हटले आहे. आफताब दिल्ली पोलिसांना सहकार्य करत आहे, परंतू त्याने श्रद्धाची हत्या केल्याचे कबुल केलेले नाहीय, असे ते म्हणाले.
आफताबच्या पोलीस कोठडीत चार दिवसांची वाढ करण्यात आली आहे. मंगळवारी साकेत न्यायालयात त्याला व्हिडीओ कॉन्फरन्सींगद्वारे हजर करण्यात आले. आफताबने न्यायालयात हत्येची कबुली दिल्याचा दावा कायदेशीर वृत्त वेबसाइट बार अँड बेंच आणि इतर काही माध्यमांनी केला होता. चिथावणी आणि रागातून श्रद्धाची हत्या केल्याचे न्यायाधीशांना सांगितल्याचे यात म्हटले होते. मी पोलिसांना सर्व काही सांगितल्याचे सांगितले. आता ती घटना आठवणे कठीण आहे, असेही तो म्हणाल्याचा दावा करण्यात आला होता.
आफताबला कोणीतरी भडकवलं देखील असेल. त्यामुळे त्याला भयंकर राग आला आणि त्याच्या हातून हत्या झाली. तसेच या घटनेत तिसरा व्यक्तीचाही समावेश असू शकतो, असा अजब दावा आफताबच्या वकिलांनी न्यायालयात केला होता.