श्रद्धा वालकर हत्याकांड : दिल्लीचे पोलिस वसईतच तळ ठोकून, आतापर्यंत १३ जणांची झाली चौकशी
By ऑनलाइन लोकमत | Published: November 24, 2022 02:54 PM2022-11-24T14:54:53+5:302022-11-24T14:56:14+5:30
श्रद्धा वालकरच्या हत्येप्रकरणी दिल्ली पोलिसांनी अद्याप १३ जणांचे जबाब नोंदवले. श्रद्धाला २०२० मध्ये झालेल्या मारहाणीसंदर्भातही तीन जणांचे जबाब नोंदविण्यात आले आहेत.
नालासोपारा : श्रद्धा वालकर हत्याकांडप्रकरणी दिल्ली पोलिस वसईत तळ ठोकून आहेत. मंगळवारपर्यंत दिल्ली पोलिसांनी १३ जणांचे जबाब नोंदवले आहेत. या तपासात पोलिसांना मुंबईशी जोडलेले धागेदोरे सापडले आहेत. श्रद्धा वालकरचा जबडा दिल्ली पोलिसांनी जप्त केला असून, त्यावरून श्रद्धाने रूट कॅनल केले असल्याचे निदर्शनास आले आहे. हे रूट कॅनल तिने मुंबईतील डॉक्टरांकडून करून घेतल्याची माहिती आफताबकडून मिळाली. त्यामुळे दिल्ली पोलिस आता मुंबईतील हा डॉक्टर कोण आहे, याचा शोध घेत आहेत. जेणेकरून त्या डॉक्टरचा जबाब नोंदवला जाऊ शकेल, असे पोलिसांचे म्हणणे आहे.
श्रद्धा वालकरच्या हत्येप्रकरणी दिल्ली पोलिसांनी अद्याप १३ जणांचे जबाब नोंदवले. श्रद्धाला २०२० मध्ये झालेल्या मारहाणीसंदर्भातही तीन जणांचे जबाब नोंदविण्यात आले आहेत. या प्रकरणाचा तपास करून पुरावे गोळा करण्यासाठी दिल्ली पोलिस सलग पाच-सहा दिवस झाले तरी वसईत तळ ठोकून आहेत. आफताबने २०२० मध्ये श्रद्धाला मारहाण केली होती. त्यावेळी ती नालासोपारा येथील ओझॉन रुग्णालयात उपचारासाठी दाखल झाली होती. याप्रकरणी एका सामाजिक कार्यकर्त्या महिलेच्या मदतीने तिने पोलिसांत तक्रार दिली होती. त्या अनुषंगाने पुरावे गोळा करण्यासाठी दिल्ली पोलिसांनी ओझॉन रुग्णालयाचे डॉ. शिवप्रसाद शिंदे तसेच समाजिक कार्यकर्त्या पूनम बिडलान यांचे जबाब नोंदवले आहेत, असे सांगण्यात आले.
अन्य तीन प्रेयसींना बोलावले चौकशीसाठी
श्रद्धा आणि आफताब नायगाव येथील एका इमारतीत भाड्याच्या सदनिकेत राहत होते. त्याच्या मालकाचाही जबाब पोलिसांनी नोंदवला आहे. तसेच आफताबचे आईवडील वसईतील ज्या सोसायटीत राहत होते, त्या सोसायटीच्या अध्यक्षाचादेखील जबाब नोंदवण्यात आला.
तसेच आफताब आणि श्रद्धाचे मित्र-मैत्रिणी गॉडवीन आणि शिवानी म्हात्रे, राहुल रॉय, मूव्हर्स अँड पॅकर्सच्या यादवसह कॉल सेंटर मॅनेजरचा दिल्ली पोलिसांनी जबाब नोंदवून घेतला आहे. दिल्ली पोलिसांनी आफताबच्या तीन अन्य प्रेयसींनाही चौकशीसाठी बोलावल्याची माहिती मिळत आहे.