...तर श्रद्धा आज जिवंत असती; मुलीच्या आठवणी सांगताना धाय मोकलून बाप रडला
By ऑनलाइन लोकमत | Published: November 14, 2022 08:28 PM2022-11-14T20:28:04+5:302022-11-14T20:28:18+5:30
कधी कधी श्रद्धा तिच्या आईसोबत फोनवरून बोलायची. तेव्हा आफताब तिला मारहाण करायचा असं तिने सांगितले.
श्रद्धा विकास वालकर मर्डर केसमध्ये नवनवीन खुलासे समोर येत आहेत. अत्यंत क्रूरपणे श्रद्धाची हत्या करण्यात आली. त्यानंतर तिच्या मृतदेहाचे ३५ तुकडे करण्यात आले. या प्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली असून त्याला ५ दिवसांच्या कोठडीत पाठवलं आहे. त्यात श्रद्धाच्या आठवणीत बाप धाय मोकलून रडला. जर श्रद्धानं ऐकलं असते तर कदाचित ती आज जिवंत असती असं तपासात पुढे आले.
ही बाब श्रद्धाच्या वडिलांनी सांगितली. विकास वालकर म्हणाले की, मुलगी आणि आफताफ पूनावालाच्या अफेअरबाबत १८ महिन्यापूर्वी आम्हाला कळालं. मुलीने २०१९ मध्ये तिच्या आईला आफताबसोबतच्या लिव्ह इन रिलेशनशिपचं सांगितले. त्याचा मी आणि माझ्या पत्नीने विरोध केला. आमचा विरोध पाहून श्रद्धानं आम्हाला प्रत्युत्तर दिले. मी २५ वर्षांची झालीय, मला माझे निर्णय घेण्याचा अधिकार आहे. मला आफताबसोबत राहायचं. मी आता तुमची मुलगी नाही असं सांगत तिने घरातून बाहेर जाण्याचा निर्णय घेतला. आम्ही तिला अडवलं पण तिने आमचं ऐकलं नाही असं त्यांनी सांगितले.
मुलीच्या जाण्यानंतर तिच्या मित्रांकडून कळालं की, ते दोघं महाराष्ट्रात वसई येथे राहत होते. कधी कधी श्रद्धा तिच्या आईसोबत फोनवरून बोलायची. तेव्हा आफताब तिला मारहाण करायचा असं तिने सांगितले. दरम्यानच्या काळात तिच्या आईचा मृत्यू झाला. पत्नीच्या मृत्यूनंतर एकदा-दोनदा श्रद्धाने वडिलांना फोन केला. आफताबच्या वर्तवणुकीबाबत तिने सांगितले. मी आफताबला सोडून परत येण्यास सांगितले पण आफताबच्या मनवण्याने ती परत तिथेच थांबायची असं त्यांनी सांगितले.
काय आहे प्रकरण?
वसईच्या विजय विहार काँप्लेक्समधील रिगल अपार्टमेंटमध्ये राहणाऱ्या श्रद्धा वालकर (२७) आणि त्याच परिसरात राहणाऱ्या आफताब पुनावाला याच्यासोबत प्रेम होते. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, या दोघांनी लग्नही केले होते. पण मुलीच्या घरच्यांना दुसऱ्या जातीत लग्न केल्याने तिच्यासोबत पटत नसल्याने भांडणे सुरू होती. यानंतर दोघेही एव्हरशाईन येथे राहायला गेले होते. त्यानंतर दोघेही मे महिन्यात दिल्ली येथे राहण्यासाठी गेले होते व दोघांनी कॉल सेंटरमध्ये कामाला सुरुवात केली होती. ४ ते ५ दिवसानंतर दोघांमध्ये कोणत्यातरी कारणावरून भांडण सुरू झाली होती.
आफताब याने १८ मे ला श्रद्धा हिचा गळा आवळून हत्या केली व नंतर तिचे शरीराचे ३५ तुकडे करून जंगलात फेकल्याचेही सूत्रांकडून कळते. मृतदेहाचे तुकडे करण्यात आले. दुर्गंधी येऊ नये म्हणून आफताबने एक मोठा फ्रीझर विकत घेतला. त्यात शरीराचे तुकडे ठेवले. अधूनमधून तो एकेक अंग पिशवीत ठेवायचा, महारौलीच्या जंगलात नेऊन टाकायचा. तो प्रेताचे छोटे तुकडे करायचा, जेणेकरून ते मानवी अवशेष आहेत हे कोणालाही कळणार नाही. आफताब याला माणिकपूर पोलिसांनी १२ ऑक्टोबरला मिसिंग दाखल करून तपासाला सुरुवात केली. या मिसिंग प्रकरणी ७ नोव्हेंबरला गुन्हे प्रकटीकरण शाखेचे सहायक पोलिस निरीक्षक सचिन सानप टीमसह चौकशी व तपासाला गेले होते. यानंतर दिल्ली पोलिसांसोबत आरोपी आफताब याला ताब्यात घेऊन चौकशी केल्यावर तपासात त्याने हत्या केल्याची कबुली दिली आहे.