Shraddha Walker Murder Case : श्रद्धाचे 35 तुकडे केले 'ते' हत्यार पोलिसांना सापडलं; चौकशीत आफताबचा धक्कादायक खुलासा
By ऑनलाइन लोकमत | Published: December 3, 2022 08:30 AM2022-12-03T08:30:34+5:302022-12-03T08:37:16+5:30
Shraddha Walker Murder Case : नार्को टेस्ट दरम्यान आफताबने श्रद्धाच्या हत्येबाबतची अनेक रहस्य उघड केल्याची माहिती मिळत आहे.
श्रद्धा वालकर हत्याकांडाने संपूर्ण देश हादरला आहे. रोज याबाबत नवनवीन माहिती ही समोर येत आहे. पोलिसांना या हत्या प्रकरणात आता अत्यंत महत्त्वाची माहिती मिळाली आहे. आफताबने श्रद्धाचे 35 तुकडे केले 'ते' हत्यार पोलिसांना अखेर सापडलं आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, चौकशीत आफताबने चायनीज चॉपरने श्रद्धाच्या मृतदेहाचे तुकडे केल्याचं समोर आलं आहे. आरोपी आफताब पूनावाला याची पॉलिग्राफ आणि नार्को चाचणी पूर्ण झाली. नार्को टेस्ट दरम्यान आफताबने श्रद्धाच्या हत्येबाबतची अनेक रहस्य उघड केल्याची माहिती मिळत आहे.
आफताबने श्रद्धाची हत्या केल्यानंतर सर्वात प्रथम तिच्या हाताचे तुकडे केले होते. नार्को टेस्टमध्ये त्याने तुकडे फेकून दिल्याचं सांगितलं. पोलीस आता त्या लोकेशनवर जाऊन हत्याराचा शोध घेत आहेत. पोलिसांनी आफताबच्या फ्लॅटमधून अनेक धारदार हत्यारं जप्त केल्याचा दावा केला आहे. या हत्यारांचा वापर हा श्रद्धाच्या मृतदेहाचे तुकडे करण्यासाठी केला गेला. आता पोलीस आफताबने हे चॉपर नेमकं कुठून खरेदी केलं याचा शोध घेण्याचा प्रयत्न करत आहेत.
"श्रद्धाचे 35 तुकडे केल्यानंतर आफताब 12 महिलांच्या संपर्कात होता, काहीजणी आलेल्या फ्लॅटवर"
18 मेच्या आधी हे हत्यारांची खरेदी केली नव्हती ना? याचा देखील पोलीस तपास करत आहेत. जर त्याने त्याआधी हत्यारं घेतल्याचे पुरावे मिळाले तर त्याने कट रचून श्रद्धाची हत्या केल्याचं सिद्ध होईल. याच दरम्यान आफताब सातत्याने रागाच्या भरात श्रद्धाची हत्या केल्याचं म्हणत आहे. श्रद्धाची हत्या केल्यानंतर अनेक महिने आफताबने तिचा मोबाईल आपल्याकडे ठेवला होता. मुंबई पोलिसांनी जेव्हा त्याला चौकशीसाठी बोलावलं तेव्हा त्याच्याकडे तो फोन होता. पण त्यानंतर त्याने श्रद्धाचा फोन मुंबईच्या समुद्रात फेकल्याचं म्हटलं आहे. आजतकने याबाबतचे वृत्त दिले आहे.
: "...म्हणून मी संतापलो अन् श्रद्धाची हत्या केली"; नार्को टेस्टमध्ये आफताबसोबत नेमकं काय घडलं?
नार्को चाचणीदरम्यान आफताबने डॉक्टरांच्या टीमला सांगितले की, श्रद्धाने आपल्याला सोडून जाण्याची धमकी दिली होती. यामुळे तो संतापला आणि त्याने श्रद्धाची हत्या केली. याशिवाय आफताबने श्रद्धाच्या मृतदेहाचे तुकडे कसे केले आणि त्याची विल्हेवाट कशी लावली हे देखील सांगितले. पोलीस सूत्राने दिलेल्या माहितीनुसार, डॉक्टरांनी आफताबला विचारले की त्याने श्रद्धाचे शिर कुठे लपवले आहे, तेव्हा तो ते ठिकाण सांगू शकला नाही. त्याने शिर नक्की कुठे लपवलं होतं हे त्याला आठवत नव्हतं. आफताबने श्रद्धाची हत्या कशी केली? त्याने तिचा मोबाईल आणि कपडे कुठे फेकले आणि शरीराचे विविध अवयव कुठे फेकले. आफताबचे जबाब हे पोलीस आणि पॉलीग्राफ चाचणीत झालेले खुलासे यांच्याशी जुळत असल्याचे सूत्रांनी सांगितलं. रागाच्या भरात त्याने श्रद्धाची हत्या केल्याचं आफताबने सांगितलं होतं.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"