श्रद्धा वालकर हत्याकांड; जप्त केलेला जबडा तपासणीसाठी पाठवला
By ऑनलाइन लोकमत | Published: November 22, 2022 06:41 AM2022-11-22T06:41:59+5:302022-11-22T06:42:22+5:30
दिल्ली पोलिसांनी रविवारी आफताबच्या फ्लॅटच्या परिसरातील जंगलातून कवटीचे काही भाग आणि काही हाडे जप्त केली होती.
नवी दिल्ली : श्रद्धा वालकरच्या अवशेषांचा शोध घेत असलेल्या दिल्ली पोलिसांनी मानवी जबड्याचे हाड जप्त केले आहे. ते पीडितेचे आहे की नाही, हे तपासण्यासाठी येथील दंतचिकित्सकाशी संपर्क साधण्यात आला आहे. दिल्ली पोलिसांनी रविवारी आफताबच्या फ्लॅटच्या परिसरातील जंगलातून कवटीचे काही भाग आणि काही हाडे जप्त केली होती. यासोबतच श्रद्धाचे शिर शोधण्यासाठी दक्षिण दिल्लीतील मैदनगढी भागातील एका तलावातून पाणी काढले जात आहे. दंतचिकित्सकाने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले की, त्याबाबत आताच काहीही सांगता येणार नाही.
आफताबची नार्को चाचणी लांबणीवर -
आफताब अमीन पूनावालाची नार्को चाचणी तूर्त टळली आहे. नार्कोपूर्वी आफताबची पॉलीग्राफिक चाचणी होईल. ज्यासाठी त्याची संमती आवश्यक आहे, त्याबद्दल पोलिसांना कळविले आहे, असे फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरीने स्पष्ट केले आहे. या चाचणीत प्रश्न विचारून गुन्हेगाराची रक्तदाब, नाडी, श्वासोच्छ्वास आदींची मोजणी करून त्याद्वारे त्याची मानसिकता याद्वारे तपासली जाते.
दंतचिकित्सक म्हणाले, जबड्यावर दाताचे रूट कॅनॉल उपचार करणाऱ्या मुंबईतील डॉक्टरांकडून एक्स-रे घेण्यास त्यांना सांगितले आहे. त्या आधारे काही बाबी ताडणे शक्य आहे.