जंगलात सापडलेली हाडे श्रद्धाचीच? आफताबला १३ दिवसांची न्यायालयीन कोठडी
By ऑनलाइन लोकमत | Published: November 27, 2022 09:04 AM2022-11-27T09:04:19+5:302022-11-27T09:04:45+5:30
आफताबला सुनावली १३ दिवसांची न्यायालयीन कोठडी
लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : जंगलात पोलिसांना सापडलेली हाडे श्रद्धा वालकर हिचीच असल्याचे न्यायसहायक प्रयोगशाळेतील डीएनए तपासणीत सिद्ध झाल्याचे वृत्त आहे. दरम्यान आरोपी आफताबला शनिवारी दिल्लीच्या न्यायालयाने १३ दिवसांची न्यायालयानी कोठडी सुनावली. आफताबला डॉ. आंबेडकर रुग्णालयात तपासणीसाठी आणले होते. रुग्णालयातूनच त्याला व्हिडीओ कॉन्फरन्सिंगने न्यायालयात हजर करण्यात आले.
हत्येनंतर आफताबने एका डॉक्टर मुलीला आपल्या घरी डेटवर बोलावले होते, अशी माहिती समोर आली आहे. बम्बल डेटिंग ॲपवर यांची ओळख झाली होती. श्रद्धासोबतही त्याची ओळख याच ॲपवर झाली होती. ही डॉक्टर मुलगी घरी आली तेव्हा श्रद्धाच्या शरीराचे तुकडे फ्रिजमध्येच होते. या डॉक्टर मुलीला दिल्ली पोलिसांनी शोधून काढले असून ती मानसोपचार तज्ज्ञ असल्याचे कळते.
काही माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, जंगलात सापडलेल्या हाडांचा डीएनए श्रद्धाच्या वडिलांच्या डीएनएशी जुळत असल्याचे फोरेन्सिक तपासणीत आढळून आले आहे. आता पोलिसांना फोरेन्सिक अहवालाची प्रतीक्षा आहे.
सीबीआय चौकशीची पित्याची मागणी
दरम्यान, श्रद्धाच्या हत्येची सीबीआयमार्फत चौकशी करण्याची मागणी श्रद्धाचे वडील विकास वालकर यांनी केली आहे. त्यांनी एका वृत्तवाहिनीला सांगितले की, आफताब हा पोलिसांची दिशाभूल करीत आहे. त्यामुळे या प्रकरणाची चौकशी सीबीआयमार्फत करण्यात यावी. श्रद्धाच्या हत्येत आफताबचा परिवारही सहभागी आहे. त्याच्या कारवाया त्याच्या आई-वडिलांना माहीत होत्या. तो श्रद्धाला मारहाण करतो, हे त्यांना माहीत होते. त्यांनी याची माहिती मला द्यायला हवी होती. तथापि, त्यांनी तसे केले नाही. त्याचे आई-वडीलही हत्येत सहभागी होते, हे मी दाव्यासह सांगतो. हत्येचे संपूर्ण सत्य बाहेर येण्यासाठी सीबीआय चौकशी व्हायला हवी.