श्रीरामपुरात ४० लाखांच्या जुन्या नोटा जप्त
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 1, 2019 21:26 IST2019-07-01T21:24:12+5:302019-07-01T21:26:15+5:30
४० लाखांच्या नोटा हस्तगत करण्यात आल्या आहेत.

श्रीरामपुरात ४० लाखांच्या जुन्या नोटा जप्त
श्रीरामपूर (जि. अहमदनगर) : चलनातून बाद झालेल्या ५०० व १ हजार रुपयांच्या सुमारे ४० लाख रुपयांच्या जुन्या नोटा घेऊन जाणाऱ्या एका आरोपीस सोमवारी पहाटेच्या सुमारास पोलिसांनीअटक केली़ त्याच्याकडून या ४० लाखांच्या नोटा हस्तगत करण्यात आल्या आहेत.
श्रीरामपूर शहरातील वॉर्ड नं.७, सरस्वती कॉलनीत देवकर वस्तीजवळ पोलिसांनी सापळा लावून आरोपी महेश मारुती डेंगळे (वय ३५, रा. सरस्वती कॉलनी) याला ताब्यात घेतले त्याच्याकडून चलनातून बाद झालेल्या ५०० रुपयांच्या १ हजार ९७६ नोटा त्याची एकूण किंमत ९ लाख ८८ हजार रुपये व १००० रुपयाच्या २ हजार ९२४ नोटा त्याची एकूण किंमत २९ लाख २४ हजार रुपये जप्त करण्यात आले़ या नोटा एका पिशवीमधून घेऊन जात असताना अप्पर पोलीस अधीक्षक रोहिदास पवार यांच्या रात्रीच्या गस्ती पथकाने ताब्यात घेतल्या़ पोलीस कॉन्स्टेबल शहाबाज सुलतान पटेल, शहर पोलीस ठाण्याचे नरवडे व तालुका पोलीस ठाण्याचे लोडे आदींचा या गस्ती पथकात समावेश आहे.
जप्त करण्यात आलेल्या नोटा आरोपीने कोठून व कोणाकडून आणल्या व कोठे घेऊन जात होता, याचा खुलासा सोमवारी रात्री उशिरापर्यंत झाला नव्हता. शहाबाज सुलतान पटेल यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन आरोपी डेंगळे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले.