शुक्रवार पेठ गोळीबार प्रकरण : मोहोळ व साथीदारांना अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: November 10, 2018 02:08 AM2018-11-10T02:08:19+5:302018-11-10T02:08:35+5:30
शुक्रवार पेठेतील शिंदे आळीत भरदिवसा झालेल्या गोळीबार प्रकरणातील मुख्य आरोपी नयन भाऊसाहेब मोहोळ (वय, २७ रा. हमालनगर, मार्केट यार्ड, पुणे) आणि त्याच्या दोन साथीदारांना खडक पोलिसांनी गुरुवारी पहाटे अडीच वाजण्याच्या सुमारास खडकवासला येथून अटक केली.
पुणे - शुक्रवार पेठेतील शिंदे आळीत भरदिवसा झालेल्या गोळीबार प्रकरणातील मुख्य आरोपी नयन भाऊसाहेब मोहोळ (वय, २७ रा. हमालनगर, मार्केट यार्ड, पुणे) आणि त्याच्या दोन साथीदारांना खडक पोलिसांनी गुरुवारी पहाटे अडीच वाजण्याच्या सुमारास खडकवासला येथून अटक केली.
गोळीबारप्रकरणी मंदार धुमाळ यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार रुपेश चंद्रशेखर पाटील, नयन मोहोळ, निखिल बाबर, शुभम बाबर, संग्राम खामकर, लुकमान नदाफ, विशाल गुंड आणि त्यांच्या ४ ते ५ साथीदारांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. रुपेश पाटील याने दिलेल्या फिर्यादीनुसार, मंदार धुमाळ, मंगेश धुमाळ, गणेश दारवटकर, अभिजित मोहिते, आकाश थापा व इतर ४ ते ५ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
गोळीबारात मंगेश धुमाळ (वय ३२, रा. शिंदे आळी, शुक्रवार पेठ) जखमी झाला होता. धुमाळ याच्या गटातील गणेश दारवटकर व मंदार धुमाळ हे किरकोळ जखमी झाले होते. तर रुपेश पाटील आणि विशाल गुंड हेही किरकोळ जखमी झाले होते. गोळीबार झाल्यानंतर पोलिसांनी शिंदे आळीमध्ये बंदोबस्त तैनात केला होता.
काही काळ परिसरात तणावाचे वातावरण होते. दोन्ही गटातील एकूण १७ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले असून त्यापैकी बहुसंख्य जणांना खडक पोलिसांनी अटक केली आहे.
नयन मोहोळ याच्याविरोधात यापूर्वी मार्केट यार्ड पोलीस ठाण्यात खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल आहे. ही कारवाई अपर पोलीस आयुक्त पश्चिम विभाग रवींद्र
सेनगावकर, परिमंडळ एकचे पोलीस उपायुक्त सुहास बाचवे, शहर सह पोलीस आयुक्त यांच्या मार्गदर्शनाखाली खडक पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मोकाशी, पोलीस निरीक्षक विजयकुमार शिंदे, तपास पथकाचे प्रभारी सहायक पोलीस निरीक्षक वैभव पवार, पोलीस कर्मचारी सतीश नागुल, राकेश क्षीरसागर, संदीप पाटील, समीर माळवदकर, बंटी कांबळे, आशिष चव्हाण, सागर कोकण, इम्रान नदाफ, प्रमोद नेवसे यांच्या पथकाने केली.
मुख्य आरोपी होता फरार
गोळीबार प्रकरणातील मुख्य आरोपी नयन मोहोळ गोळीबार झाल्यापासून फरार होता. त्याचा शोध पोलीस घेत होते. बुधवारी मध्यरात्रीच्या सुमारास नयन मोहोळ खडकवासला भागात येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. वरिष्ठांच्या मार्गदर्शनानुसार खडक पोलिसांनी त्याला मध्यरात्री अटक केली. त्यावेळी मोहोळबरोबर असणाऱ्या निखिल मुकुंद बाबर (वय २४ ) आणि शुभम गोरख बाबर (वय २३, दोघेही रा. हमालनगर, मार्केट यार्ड, पुणे) यांनाही अटक करण्यात आली.