Sidhu Moose Wala: पंजाब पोलिसांची सीमापार कारवाई! सिद्धू मूसेवालाच्या हत्येतील आरोपी सचिन बिश्नोईला अझरबैजानमधून अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: August 30, 2022 11:12 AM2022-08-30T11:12:51+5:302022-08-30T11:13:18+5:30
Sidhu Moose Wala murder: कॅनडात बसलेला गँगस्टर गोल्डी ब्रार आणि तुरुंगात असलेल्या लॉरेन्स बिश्नोईला सिद्धूला कोणत्याही किंमतीत मारायचेच होते. मुसेवाला यांच्या मृत्यूची सर्वत्र चर्चा व्हावी, अशी दोघांची इच्छा होती.
सिद्धू मुसेवाला हत्याकांडामध्ये पंजाब पोलिसांनी थेट परदेशात जाऊन कारवाई केली आहे. मुसेवालाच्या हत्ये प्रकरणातील मुख्य आरोपी लॉरेन्स बिश्नोईचा पुतण्या सचिन बिश्नोईला ताब्यात घेण्यात आले आहे. त्याला अझरबैजानमधून अटक करण्यात आली आहे.
लॉरेन्स गँगला सचिन बिश्नोई हा बाहेरून आदेश, सूचना देत होता. मूसेवाला खून प्रकरणात मानसा पोलिसांनी शुक्रवारी आरोपपत्र दाखल केले होते. 1850 पानांच्या आरोपपत्रात 24 आरोपींच्या नावांचा समावेश आहे. यापैकी 20 जणांना अटक करण्यात आली आहे. चार आरोपी परदेशात लपून बसल्याचे सांगण्यात येत होते. या हत्येचा मुख्य सूत्रधार गँगस्टर लॉरेन्स बिश्नोई सध्या पंजाब पोलिसांच्या ताब्यात आहे.
परदेशात लपून बसलेल्या आरोपींमध्ये मुख्य आरोपी गोल्डी ब्रार, सचिन बिश्नोई, अनमोल बिश्नोई आणि लिजीन नेहरा यांचा समावेश आहे. या प्रकरणी एसएसपी गौरव तोरा यांनी 34 आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केल्याचे सांगितले होते. 24 आरोपींविरुद्ध न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले आहे. या हत्याकांडात सहभागी असलेले जगरूप रूपा आणि मनप्रीत मनू कुस्सा हे पोलिस चकमकीत ठार झाले आहेत. त्यांच्या एन्काऊंटरची माहिती न्यायालयाला देण्यात आली आहे.
कॅनडात बसलेला गँगस्टर गोल्डी ब्रार आणि तुरुंगात असलेल्या लॉरेन्स बिश्नोईला सिद्धूला कोणत्याही किंमतीत मारायचेच होते. मुसेवाला यांच्या मृत्यूची सर्वत्र चर्चा व्हावी, अशी दोघांची इच्छा होती. 28 वर्षीय सिद्धू मुसेवाला यांची 29 मे रोजी हत्या करण्यात आली होती. लॉरेन्स बिश्नोई आणि गोल्डी ब्रार यांनी गायकाच्या हत्येची जबाबदारी घेतली. हत्येचे प्लॅनिंग खूप आधीपासून करण्यात आले होते. भरदिवसा घडलेल्या या घटनेने सर्वांनाच धक्का बसला.