सिद्धू मुसेवाला हत्या प्रकरणात पाकिस्तानी कनेक्शन! NIAचा महत्त्वाचा खुलासा
By ऑनलाइन लोकमत | Published: July 17, 2023 02:17 PM2023-07-17T14:17:24+5:302023-07-17T14:22:28+5:30
लॉरेन्स बिश्नोई टोळीतील गोल्डी ब्रारने स्वीकारली होती जबाबदारी
Sidhu Moose Wala Murder Case, Pakistan Connection: पंजाबी गायक आणि काँग्रेस नेते सिद्धू मूसेवालाच्या हत्येला एक वर्ष पूर्ण होत असतानाच एक मोठा खुलासा झाला आहे. त्याच्या हत्या प्रकरणात पाकिस्तानी कनेक्शन समोर आले आहे. नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी (NIA)च्या म्हणण्यानुसार, दुबईतील पाकिस्तानी शस्त्रास्त्र पुरवठादाराने गेल्या वर्षी सिद्धू मुसेवालाच्या हत्येसाठी वापरलेली शस्त्रे पुरवली होती. हमीद असे हत्यार पुरवणाऱ्या व्यक्तीचे नाव होते. सिद्धू मुसेवालाच्या हत्येपूर्वी हमीदने दुबईतील लॉरेन्स बिश्नोई गँगच्या बुलंदशहर येथील एका शस्त्रास्त्र विक्रेत्याची भेट घेतली होती.
आर्म डीलरने दुबईला भेट दिली
बुलंदशहर येथून 8 डिसेंबर 2022 रोजी राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) एका शस्त्रास्त्र विक्रेत्याला अटक केल्याचे तपासात समोर आले. दुबईतील हवाला ऑपरेटरच्या म्हणण्यानुसार, तो अनेक वेळा दुबईला गेला होता आणि या भेटींमध्ये तो पाकिस्तानी नागरिक असलेल्या फैजी खानच्या संपर्कात आला होता.
फैजी खान हमीदला भेटला
फैजी खानने बुलंदशहरच्या शस्त्रास्त्र व्यापार्याची ओळख हमीदशी करून दिली. तो एक पाकिस्तानी नागरिक आणि शस्त्रास्त्र तस्कर करणारा होता. अशाच एका भेटीदरम्यान अन्सारी आणि हमीद यांनी शस्त्रास्त्रांची तस्करी, व्यवसाय आणि भारतात शस्त्रास्त्रे आणि दारूगोळा पुरवठा करण्याबाबत चर्चा केली.
29 मे 2022 ला सिद्धू मुसेवालाची हत्या झाली. पंजाबी गायक सिद्धू मूस वाला यांची पंजाबमधील मानसा येथील जवाहरके गावात गोळीबार करण्यात आला. तो सुरक्षेशिवाय आपल्या काही मित्रांसह थारमधून प्रवास करत होता. त्यांची कार मानसा येथे पोहोचल्यावर सहा हल्लेखोरांनी त्यांना घेरले आणि अंदाधुंद गोळीबार सुरू केला. त्यातच मुसेवालाची हत्या झाली. नंतर या हत्येची जबाबदारी लॉरेन्स बिश्नोई टोळीतील गोल्डी ब्रार याने स्वीकारली. मुसेवालाच्या हत्येत सहभागी असलेल्या चार हल्लेखोरांना अटक करण्यात आली आहे, तर दोन चकमकीत मारले गेले आहेत.