फारकतनाम्यावर सही कर; अन्यथा पॉलिसी बंद! घटस्फोटासाठी पतीचा प्रताप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 13, 2022 02:06 PM2022-11-13T14:06:05+5:302022-11-13T14:15:16+5:30
१२ नोव्हेंबर रोजी रात्री १ च्या सुमारास पोलीस दप्तरी गुन्ह्याची नोंद करण्यात आली.
अमरावती : फारकतनाम्यावर सही करत नसल्याने विमा पॉलिसी बंद करण्याची धमकी देत एका विवाहितेचा अनन्वित छळ करण्यात आला. तो जाच असह्य झाल्याने अखेर तिने माहेर व पुढे पोलीस ठाणे गाठले. याप्रकरणी परतवाडा पोलिसांनी तिचा पती उज्वल रमेशचंद्र अग्रवाल (४०, रा. मिश्रालाईन, परतवाडा) व अन्य एकाविरूद्ध कौटुंबिक छळाचा गुन्हा दाखल करण्यात आला. १२ नोव्हेंबर रोजी रात्री १ च्या सुमारास पोलीस दप्तरी गुन्ह्याची नोंद करण्यात आली.
तक्रारीनुसार, तक्रारकर्त्या महिलेचे सन २०१३ मध्ये उज्वल अग्रवाल याच्यासोबत लग्न झाले होते. त्या दाम्पत्याला आठ वर्षे वयाची मुलगी देखील आहे. प्रॉपर्टी ब्रोकर असलेला पती उज्वल याने बऱ्याच वर्षांपासून आपला छळ चालविला. मात्र, मुलीकडे, कुटुंबाकडे पाहत तो त्रास ती सहन करत राहिली. अलिकडे त्याला दारूचे व्यसन लागले. नेहमीच दारू घेऊन घरी आला की, तो शेत खरेदीसाठी माहेरहून ३ लाख रुपये आण अशी मागणी करायचा. त्याला नकार दिला की तो आपल्याला शिवीगाळ करायचा. पती उज्वल अग्रवाल आपल्या चारित्र्यावर संशय घेतात तर, सासु ही घरगुती कामावरुन शिवीगाळ करत असल्याचे विवाहितेने तक्रारीत म्हटले आहे.
अशी घडली घटना
११ नोव्हेंबर रोजी सकाळी १० च्या सुमारास पती उज्वल आपल्याकडे आला. तू फारकतनाम्यावर सही करत नाही, म्हणून मला तुझ्या नावावर असलेली एलआयसी पॉलिसी बंद करायची आहे, असे त्याने सुनावले. त्यावर आपण सही करणार नाही, असे ठामपणे बजावल्याने त्याने चिडून शिवीगाळ केली. त्यामुळे आपण मुलीला घेऊन चांदूररेल्वे येथील माहेर गाठले. असे विवाहितेने तक्रारीत म्हटले आहे. ११ ला रात्रीच तिने माहेरच्या आप्तांसह परतवाडा पोलीस ठाणे गाठून पती व अन्य एकाविरूद्ध तक्रार दाखल केली.