सायन हॉस्पिटल अपघात प्रकरण: चौकशीनंतर दोषींवर होणार कठोर कारवाई- अतिरिक्त आयुक्त
By ऑनलाइन लोकमत | Published: May 27, 2024 06:45 AM2024-05-27T06:45:45+5:302024-05-27T06:46:13+5:30
डॉ. राजेश डेरे यांचा गुन्हा जामीनपात्र असल्यामुळे त्यांना २० हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर सोडण्यात आले
लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: महापालिकेच्या सायनसारख्या मोठ्या रुग्णालयाच्या परिसरात डॉक्टराकडूनअपघात होतो. त्यात एका महिलेचा मृत्यू होतो. त्या घटनेची माहिती रुग्णालय प्रमुखाला उशिरा मिळते. महापालिका प्रशासनाला सर्वांत नंतर कळते. पोलिस गुन्हा दाखल करून डॉक्टरलाअटक करतात, या सर्व घटनेची माहिती वेळेतच का मिळाली नाही, यामागे काय हेतू होता. या सर्वांची चौकशी होणार असून, कर्तव्यात कसूर करणाऱ्यांवर कठोर कारवाई करणार असल्याची माहिती अतिरिक्त महापालिका आयुक्त डॉ. सुधाकर शिंदे यांनी दिली.
सायन रुग्णालयातील न्यायवैद्यक विभागाचे प्रमुख डॉ. राजेश डेरे यांच्या गाडीने रुग्णालयाच्या आवारात वृद्ध महिलेला उडविले. त्यानंतर उपचारार्थ त्याच रुग्णालयात दाखल केल्यांनतर काही वेळाने त्या महिलेचा मृत्यू झाला. रुबेदा शेख या महिलेचे नाव असून, उपचार घेण्याकरिता ती रुग्णालय आली असताना हा प्रकार घडला. अपघाताची घटना शुक्रवारी रात्री घडली. शनिवारी रात्री उशिरा डॉक्टरांना या प्रकरणात अटक झाली. मात्र, या प्रक्रियेस एवढा विलंब का झाला? असा प्रश्न विचारण्यात येत आहे. सायन रुग्णालयात २४ तास डॉक्टर आणि रुग्णांची ये-जा सुरू असते. अपघातासारखी घटना रुग्णालय परिसरात घडते. त्यामध्ये रुग्णालयाचा प्राध्यापकचा सहभाग असतो. मात्र, रुग्णालय प्रमुखच या घटनेपासून अनभिज्ञ असतो, याबाबत आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
डॉ. राजेश डेरे यांना जामीन मंजूर
डॉ. राजेश डेरे यांना रविवारी सुट्टीकालीन न्यायालयासमोर हजर करण्यात आले. यावेळी न्यायालयाने त्यांची २० हजार रुपयांच्या रोख जामिनावर सुटका केली आहे. डॉ. डेरे हे रुग्णालयात न्यायवैद्यक विभागात कार्यरत आहेत. हा गुन्हा जामीनपात्र असल्यामुळे डेरे यांना २० हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर सोडण्यात असून, आम्ही या गुन्ह्यातील तपासाला संपूर्ण सहकार्य करणार असल्याचे डॉ. डेरे यांचे वकील आयुष पासबोला यांनी सांगितले.
सायन रुग्णालय परिसरातील घटना दुर्दैवी आहे. या घटनेची सखोल चौकशी केली जाणार आहे. या घटनेची माहिती रुग्णालय प्रशासनाला वेळेवर देण्यात आली नाही. ही गंभीर बाब आहे. त्यामुळे प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कारवाई केली जाणार आहे.
- डॉ. सुधाकर शिंदे, अतिरिक्त महापालिका आयुक्त (आरोग्य)