एटीएममधील सायरन वेळीच वाजल्याने चोरट्यांनी ठोकली धूम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2018 08:06 PM2018-07-14T20:06:53+5:302018-07-14T20:07:26+5:30
एटीएम फोडत असताना सायरन वाजल्याने चोरांची धांदल उडाली आणि त्यांनी लागलीच धूम ठोकली. या प्रकारात एटीएममधील२ लाख ७२ हजार ९०० रुपये मात्र सुरक्षित राहिले.
औरंगाबाद : अगदी सकाळच्या वेळी एटीएम फोडण्याच्या तयारीने काही चोरटे हातात टॉमी आणि इतर साहित्य घेऊन निघाले. उस्मानपुऱ्यातील सेंट्रल बँक आॅफ इंडियाच्या एटीएमवर ते पोहोचले. त्यांनी एटीएम फोडण्यास सुरुवातही केली. मात्र, रोकड असलेला ट्रे फोडण्याचा प्रयत्न करीत असताना अचानक एटीएममधील सायरन जोराने वाजू लागला. सायरन वाजल्याने चोरांची धांदल उडाली आणि त्यांनी लागलीच धूम ठोकली. या प्रकारात एटीएममधील२ लाख ७२ हजार ९०० रुपये मात्र सुरक्षित राहिले.
क्रांतीचौककडून उस्मानपुऱ्याकडे जाणाऱ्या रस्त्यावरील सेंट्रल बँक आॅफ इंडियाच्या एटीएमवरील शुक्रवारी सकाळची ही घटना आहे.
या एटीएमवर चोरट्यांनी सर्वात आधी एटीएम मशीनचे गेट लॉक आणि वायर तोडून त्यांनी आवरण काढून बाजूला फेकले. रोकड असलेला ट्रे फोडण्याचा प्रयत्न ते करीत असतानाच मशीनमधील सायरन वाजू लागला. सायरनच्या आवाजामुळे पकडले जाण्याच्या भीतीपोटी त्यांनी तेथून धूम ठोकली. दरम्यान, एटीएम फोडण्याचा प्रयत्न झाल्याचा बँकेच्या मुंबईतील मुख्यालयास गेला. त्यानंतर गस्तीवरील पोलीस आणि उस्मानपुरा ठाण्याचे निरीक्षक घोडके, उपनिरीक्षक कल्याण शेळके, गुन्हे शाखेचे निरीक्षक मधुकर सावंत आणि कर्मचारी घटनास्थळी धावले.
पोलिसांना आव्हान
एटीएम फोडून त्यातील रोकड लुटण्याचे यापूर्वीही अनेक प्रयत्न शहरात झाले. मात्र आज चक्क सकाळी ७ वाजेच्या सुमारास चोरटे त्या एटीएम सेंटरमध्ये घुसले आणि त्यांनी निडरपणे एटीएम मशीन फोडले, सुदैवाने रोख रक्कम त्यांच्या हाती लागण्यापूर्वीच सायरन वाजल्याने ते पळाले. या चोरट्यांनी वर्दळीच्या ठिकाणचे एटीएम फोडून पोलीस यंत्रणेला एक प्रकारे खुले आव्हान दिले.