नागपुरातील कुख्यात कडवविरुद्ध सीताबर्डीतही गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 7, 2020 08:59 PM2020-07-07T20:59:05+5:302020-07-07T21:00:39+5:30
रेल्वेत टीसीची नोकरी लावून देतो, असे आमिष दाखवून एका पानटपरी चालकाकडून सहा लाख रुपये हडपणाऱ्या कुख्यात गुंड मंगेश कडवविरुद्ध सीताबर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : रेल्वेत टीसीची नोकरी लावून देतो, असे आमिष दाखवून एका पानटपरी चालकाकडून सहा लाख रुपये हडपणाऱ्या कुख्यात गुंड मंगेश कडवविरुद्ध सीताबर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. नोकरीचे आमिष दाखवून कडव याने अनेकांची फसवणूक केल्याचे आणि सीताबर्डी ठाण्यात त्याच्या विरुद्ध गुन्हा दाखल होणार असल्याचे वृत्त गेल्या दोन दिवसापासून ‘लोकमत’ने प्रकाशित केले आहे, हे येथे विशेष उल्लेखनीय !
किशोर फुलचंद तलाठी (वय ६२) असे पीडित व्यक्तीचे नाव आहे. ते धरमपेठ येथील लक्ष्मीभुवन चौकाजवळ राहतात. ते पानटपरी चालवितात. आयुष्यभर काटकसर करून त्यांनी काही रक्कम जमा केली होती. आरोपी मंगेश कडवसोबत ओळख झाल्यानंतर तलाठी यांनी कडवला आपला मुलगा बेरोजगार आहे, कुठे तरी लावून द्या, अशी विनंती केली. कडवने तलाठी यांचा मुलगा राजकुमार याला रेल्वेत टीसीची नोकरी लावून देतो, अशी थाप मारली. त्यानुसार २८ एप्रिल २०२० ला तलाठी यांच्याकडून ६ लाख रुपये घेतले. ही रक्कम घेतल्यानंतर मुलाला रेल्वेत नोकरी मिळेल या आशेने तलाठी आरोपी कडवसोबत रोज संपर्क साधत होते. सुरुवातीला वेगवेगळे कारण सांगून टाळाटाळ करणाºया कडवने नंतर त्यांना धमकावणे सुरू केले. अलीकडे तलाठी यांना कडवचा संशय येऊ लागला. तो नोकरी लावून देणार नाही, याची खात्री पटल्यामुळे त्यांनी कडवला आपली रक्कम परत मागितली असता आरोपीने तलाठी यांना जिवे ठार मारण्याची धमकी दिली. याबाबत कुणाला काही सांगितल्यास गंभीर परिणाम होतील, असेही धमकावले. त्याच्या गुंडगिरीमुळे तलाठी गप्प बसले. तिकडे कडवच्या पापाचा बोभाटा झाल्यामुळे आणि पोलिसांनी त्याच्याविरुद्ध अनेक गुन्हे दाखल केल्यामुळे तलाठी यांनी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांशी संपर्क साधला. या पार्श्वभूमीवर गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त गजानन शिवलिंग राजमाने यांनी सीताबर्डीचे ठाणेदार जगवेंद्र राजपूत यांच्याकडून तलाठी यांच्या तक्रारीची शहानिशा करून घेतली आणि सोमवारी उशिरा रात्री या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला.
रुचिता कडवला पोलीस कोठडी
दरम्यान, २० लाख रुपयांच्या फसवणूक प्रकरणात गुन्हे शाखेने सोमवारी मंगेश कडवची पत्नी रुचिता हिला अटक केली. तिला आज न्यायालयात हजर करून पोलिसांनी तिचा एक दिवसाचा पीसीआर मिळविला.
कडववर चोहोबाजूंनी दबाव
फरार असलेल्या मंगेश कडव याच्याविरुद्ध दाखल झालेला सीताबर्डीतील पाचवा गुन्हा होय. यापूर्वी त्याच्याविरुद्ध अंबाझरी, सक्करदरा, बजाजनगर आणि हुडकेश्वर ठाण्यात गुन्हे दाखल झाले आहेत. हुडकेश्वरच्या गुन्ह्यात त्याची पत्नीही आरोपी आहे. तिला अटक करून पोलिसांनी मंगेश कडववर मोठा दबाव निर्माण केला आहे.