स्टेट बॅंकेच्या फसवणूक प्रकरणी भुसावळातील सहा जणांना अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: October 24, 2021 09:02 PM2021-10-24T21:02:44+5:302021-10-24T21:03:06+5:30
Crime News : तब्बल दीड कोटींची फसवणूक केल्याप्रकरणी १७ कर्जदारांविरोधात गुन्हा दाखल होता.
भुसावळ जि. जळगाव : शहरातील स्टेट बँकेच्या आनंद नगर शाखेची कर्ज वाटपात तब्बल दीड कोटींची फसवणूक केल्याप्रकरणी १७ कर्जदारांविरोधात गुन्हा दाखल होता. यातील सहा जणांना रविवारी अटक करण्यात आली आहे.
राजेश निवृत्ती मेहरे (रा. गोरक्षण संस्था, भुसावळ), शकील इमाम गवळी, निलेश जय सपकाळे (दोन्ही रा.कन्हाळा, ता. भुसावळ), आसीफ हुसेन गवळी (रा. द्वारका नगर, भुसावळ), गजानन रमेश शिंपी (नेब कॉलनी, भुसावळ), आणि पंकज भोजनराव देशमुख (रा.पंचशील नगर, भुसावळ) यांचा अटक करण्यात आलेल्यांमध्ये समावेश आहे.
या १७ जणांनी मिळकती नसताना बनावट सौदा पावत्या बनविल्या आणि बॅंकेकडून जवळपास दीड कोटी रुपयांचे कर्ज घेतले. यात नऊ जण कर्ज घेणारे, सहा जण सौदा पावती लिहून देणारे आणि दोन जण व्हॅल्यूअर आहेत. याबाबत ७ ऑक्टोबर रोजी भुसावळ बाजारपेठ पोलिसात फसवणुकीचा गुन्हा दाखल होता. पोलिसांकडून मागील पंधरा दिवसांमध्ये पुरावे गोळा करण्यात आले. रविवारी सकाळी चार पथके नेमण्यात आली. या पथकांनी सहा जणांना अटक केली आहे. ही कारवाई पोलीस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांच्या मार्गदर्शाखाली बाजारपेठ पोलीस निरीक्षक दिलीप भागवत, सहायक निरीक्षक गणेश धुमाळ, शहरचे सहायक निरीक्षक संदीप दुनगहू यांनी केली.