स्टंटबाज सहा परदेशी नागरिकांची पोलिसांनी केली मायदेशी रवानगी
By ऑनलाइन लोकमत | Published: November 28, 2018 08:13 PM2018-11-28T20:13:49+5:302018-11-28T20:15:57+5:30
इमारतीतील रहिवाशांनी दादर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली असता या सहा परदेशी नागरिकांचा माग काढत पोलिसांनी ताब्यात घेतले होते.
मुंबई - प्रभादेवी रेल्वे स्थानकानजीक एका इमारतीच्या टेरेसवर जीवघेणा स्टंटबाजी करणाऱ्या सहा परदेशी नागरिकांची मुंबई पोलिसांनी मायदेशी रवानगी केली आहे. याप्रकरणी इमारतीतील रहिवाशांनी दादर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली असता या सहा परदेशी नागरिकांचा माग काढत पोलिसांनी ताब्यात घेतले होते.
प्रभादेवी स्थानकानजीक डॉ. बाबासाहेब आंबेडकर ही १४ मजल्यांची एसआरए इमारत आहे. या इमारतीत आणि बाजूच्या इमारतीत एकूण २२ फुटांचे अंतर आहे. हे ६ जण कुणाच्याही नकळत एका इमारतीच्या टेरेसच्या कठड्यावरून दुसऱ्या इमारतीच्या टेरेसवर उडी मारत होते. एका अज्ञात व्यक्तीने ही स्टंटबाजी मोबाइलवरून शूट करून ती सोशल मीडियावर टाकताच हा काळजाचा ठोका चुकविणारा व्हिडीओ वायरल झाला. सोमवारी दुपारी या इमारतीचा सुरक्षा रक्षक इमारतीचा पाणीपुरवठा तपासण्यासाठी टेरेसवर गेला असता त्याने ही स्टंटबाजी बघितली. त्यानंतर त्याने तात्काळ यासंदर्भातील माहिती इमारतीच्या रहिवाशांना दिली. रहिवाशांनी देखील वेळ न घालवता या स्टंटबाजांविरोधात दादर पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवली. पोलिसांनी या व्हिडीओवरून ६ जणांचा माग काढल्यावर ते परदेशी नागरिक असल्याचे पुढे आले. पर्यटनासाठी मुंबईत आलेले हे सहाही जण ताज हॉटेलमध्ये थांबले होते. तिथून दादर पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. परदेशात हा प्रकार रुफ टॉप जंप म्हणून प्रसिद्ध आहे. परंतु भारतात मात्र असे स्टंट करणं कायद्याने गुन्हा आहे. टुरिस्ट व्हिसाच्या नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी या सहा जणांवर कारवाई करून मायदेशी पाठविण्यात आले.
Video : परदेशी नागरिकांचा मुंबईत जीवघेणा स्टंट