जुगार खेळणारे सहा अटकेत, तीन फरार, ११.७६ लाखांचा मुद्देमाल जप्त; कोराडी पोलिसांची कारवाई
By दयानंद पाईकराव | Published: May 19, 2024 04:26 PM2024-05-19T16:26:34+5:302024-05-19T16:27:53+5:30
जुगार अड्डयाबाबत विचारणा केली असता आरोपींनी आकाश कोलते, भरत यादव आणि गौरव डाखोरे हे जुगार अड्डा चालवित असल्याचे सांगितले.
दयानंद पाईकराव, नागपूर : जुगार खेळणाऱ्या सहा आरोपींना कोराडी पोलिसांनी शनिवारी सायंकाळी ७.४५ वाजताच्या सुमारास अटक करून त्यांच्या ताब्यातून ११ लाख ७६ हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. दरम्यान जुगार खेळणारे तीन आरोपी फरार झाले असून पोलिस त्यांचा शोध घेत आहेत.
अफरोज अब्दुल खालीद (२८, रा. गोधणी रेल्वे, मानकापूर), प्रमोद सुरेशराव मानकर (३०, रा. झिंगाबाई टाकळी, मानकापूर), खदाबक्ष शेरखा पठाण (४०, रा. पिटेसूर), ललीत शंकर महाजन (३०, रा. गोधणी रेल्वे, मानकापूर), तन्मय सतीश जाधव (१९, रा. कोलते ले-आउट, नागपूर) आणि विनोद सुधाकर बोराटे (२८, रा. गोधणी, ग्रामपंचायत जवळ) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. तर आकाश कोलते, भरत यादव दोघे रा. हनुमान मंदीर जवळ, गोधणी आणि गौरव डाखोरे (रा. महाजन कॉम्प्लेक्सजवळ, गोधणी रोड) अशी फरार आरोपींची नावे आहेत. कोराडी पोलिसांना बंसल कन्स्ट्रक्शन कंपनीसमोर सिमेंट रोड पलिकडील जंगलाच्या झोपडीत चक्की खापा येथे जुगार सुरु असल्याची माहिती मिळाली.
पोलिसांनी धाड टाकून सहा आरोपींना ताब्यात घेतले तर तीन आरोपी फरार झाले. जुगार अड्डयाबाबत विचारणा केली असता आरोपींनी आकाश कोलते, भरत यादव आणि गौरव डाखोरे हे जुगार अड्डा चालवित असल्याचे सांगितले. आरोपींच्या ताब्यातून रोख ६ हजार ८०० रुपये, मोबाईल, क्रेटा कार, ९ दुचाकी असा एकुण ११ लाख ७६ हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. आरोपींविरुद्ध कलम १२ महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला.