खंडणी म्हणून मागितली बीएसयूपीतील सहा घरे, कार्यालयीन अधीक्षकांची तक्रार
By ऑनलाइन लोकमत | Published: January 7, 2023 09:29 AM2023-01-07T09:29:49+5:302023-01-07T09:30:06+5:30
आहेर २ डिसेंबर २०२२ रोजी सायंकाळी ४ वाजण्याच्या सुमारास नौपाडा येथील नोंदणी कार्यालयाजवळील अनधिकृत बांधकामाची पाहणी करण्यासाठी जात होते. त्याचवेळी सौरभ आणि त्याचा अन्य एक साथीदार यांनी आपसात संगनमत करून त्यांचा जाण्याचा मार्ग अडवला.
ठाणे : बीएसयूपी योजनेतील सहा सदनिकांची खंडणीच्या रूपाने मागणी करून ती न दिल्यास चॉपरने जीवे मारण्याची धमकी ठाणे महापालिकेच्या स्थावर मालमत्ता विभागाचे कार्यालयीन अधीक्षक महेश आहेर (५५) यांना सौरभ वर्तक याच्यासह दोघांनी दिल्याने खळबळ उडाली आहे. आहेर यांनी गुन्हा दाखल केल्याची माहिती नौपाडा पोलिसांनी शुक्रवारी दिली.
आहेर २ डिसेंबर २०२२ रोजी सायंकाळी ४ वाजण्याच्या सुमारास नौपाडा येथील नोंदणी कार्यालयाजवळील अनधिकृत बांधकामाची पाहणी करण्यासाठी जात होते. त्याचवेळी सौरभ आणि त्याचा अन्य एक साथीदार यांनी आपसात संगनमत करून त्यांचा जाण्याचा मार्ग अडवला. सौरभशी त्यांचा कोणताही व्यवहार झालेला नसताना धर्मवीरनगर, तुळशीधाम येथील बीएसयूपी प्रकल्पातील सहा फ्लॅट हे खंडणी स्वरूपात द्यावेत. ते न दिल्यास चॉपरसारखे हत्यार पोटात खुपसून तुला ढगात पाठवेन, अशी धमकी सौरभने आहेर यांना दिली. यावेळी सौरभने चॉपर दाखवून इतर लोकांना तिथून जाण्याचा इशारा करीत धमकावले. त्यामुळे तिथे जमलेले लोक पळून गेले. तसेच एका व्यक्तीच्या व्हॉट्सॲपवर नोव्हेंबर २०२१ मध्ये सौरभ आणि इमरान यांच्या संभाषणातही त्यांनी आहेर यांना मारण्याचा इशारा देत शिवीगाळ केली होती.
त्यानंतर सहा फ्लॅटच्या खंडणीसाठी धमकविल्यामुळे आहेर यांनी ५ जानेवारी रोजी नौपाडा पोलिस ठाण्यात खंडणीसह, धमकी देणे, शिवीगाळ करणे आणि सरकारी कामात अडथळा आणल्याबाबत गुन्हा दाखल केला आहे. यातील आरोपी अन्य एका गुन्ह्यात आधीच अटक असल्यामुळे त्याला या गुन्ह्यातही अटकेची कार्यवाही करण्यात येत असल्याची माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक संजय धुमाळ यांनी दिली.