दुचाकीच्या डिक्कीतून सहा लाख रुपये लंपास; चोरटे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद
By अनिल गवई | Published: March 16, 2023 05:50 PM2023-03-16T17:50:09+5:302023-03-16T17:50:23+5:30
खामगाव तालुक्यातील तसेच आसपाच्या खेड्यातील शेतकरी तसेच सामान्य बाजारासाठी येथे येतात.
खामगाव: दुचाकीच्या डिक्कीतून सहा लाख रुपयांची रोकड लंपास करण्यात आली. ही घटना गुरुवारी दुपारी स्थानिक गांधी चौक भागात घडली. या घटनेमुळे खामगावात एकच खळबळ उडाली असून चोरटे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहे. गुरूवारी खामगाव शहरात आठवडी बाजार भरतो. खामगाव तालुक्यातील तसेच आसपाच्या खेड्यातील शेतकरी तसेच सामान्य बाजारासाठी येथे येतात.
दरम्यान, गुरूवारी कृषी उत्पन्न बाजार समिती मधील अडते श्याम बजरंग गायकवाड यांनी दुपारी एका बँकेतून ६ लाख रुपये काढले व ही रक्कम त्यांनी मामा प्रमोद नागोराव मोठे रा. शेगाव यांच्याकडे दिली व हे पैसे दुकानावर पोहचून द्या असे सांगितले. ही रक्कम घेवून प्रमोद मोठे अनंता लोड यांच्यासह दुचाकीने जात होते. दरम्यान, दोघे नाश्ता करण्यासाठी गांधी चौकातील एका उपहार गृहासमोर थांबले.
पैशांची बॅग दुचाकीच्या डिक्कीत ठेवून ते नाश्ता करण्यासाठी दुकानावर गेले. यावेळी त्यांचा पाठलाग करत आणखी दोन दुचाक्या तेथे आल्या. यातील एका दुचाकीवरील भामट्याने मोठे यांच्या दुचाकीजवळ जात डुप्लिकेट चावीने डिक्की उघडून त्यातील ६ लाखाची बॅग घेवून दोघे तेथून पसार झाले. ही घटना काही वेळाने उघडकीस आली.
बनावट चावीने उघडली डिक्की
गांधी चौकात चोरट्यांनी बनावट चावीने डिक्की उघडून रक्कम लंपास केली. ही घटना सीसी कॅमेर्यात कैद झाली. याघटनेची माहिती शहर पोलीसांना मिळाली. त्यानंतर शहर पोलीसांनी त्वरीत घटनास्थळी येवून सिसीटीव्हीची पाहणी केली. यावेळी चोरटे सिसीटीव्ही फुटेजमध्ये चोरी करतांना दिसत असून, पोलिस त्या आधारे त्यांचा शोध घेत आहेत.